काँग्रेसचे आंदोलन

नागपूर जिल्ह्य़ातील मतदार याद्यांमध्ये अनेक बोगस मतदारांचा समावेश असल्याचे समोर आले असून काँग्रेसने मतदार यादीतील घोळ लोकसभा निवडणुकांपूर्वी दूर करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने एका मतदारांचे वेगवेगळ्या मतदारसंघाच्या यादीत नावे असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या निदर्शनास आणून दिले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले आणि यादीत घोळ तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये राज्यभरात एकूण ८ कोटी ४४ लाख मतदार आहेत. यामध्ये सुमारे ४४ लाख ६१ हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात अशा प्रकारची एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे असलेल्या मतदारांची संख्या सहाही विधानसभा क्षेत्रात एकूण २३१३८ अशी मोठी असल्याचे दिसून येते. नागपूर जिल्ह्य़ात देखील सर्वच विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी असल्याची तक्रार सर्वच ठिकाणी दिसून येते, असे विकास ठाकरे म्हणाले. अनेक महिने मतदार यादीचा अभ्यास केल्यानंतर काँग्रेस पक्षाने बुथनिहाय विधानसभा मतदारसंघात एकाहून अधिक वेळा नोंदणी असलेली अधिक मतदारांची यादी तयार केली आहे. त्याप्रमाणे रामटेक मतदारसंघातील उमरेड, कामठी, रामटेक, सावनेर, काटोल आणि हिंगणा एकूण ३१२४५ नावे एकाहून अधिक वेळा मतदार यादीमध्ये नोंदवल्या गेली असल्याचे ते म्हणाले.