16 October 2019

News Flash

मेडिकलमधील बोनमॅरो नोंदणीचा देखावा

रक्ताचा कर्करोग, सिकलसेलसह आनुवंशिक रक्त आजारांवरील उपचारांस बोनमॅरो प्रत्यारोपण महत्त्वाचे आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

|| महेश बोकडे

रक्ताचा कर्करोग, सिकलसेलसह आनुवंशिक रक्त आजारांवरील उपचारांस बोनमॅरो प्रत्यारोपण महत्त्वाचे आहे. बोनमॅरो दात्यांची नोंदणी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सप्टेंबर २०१७ ला सुरू करण्यात आली. उद्घाटन काळातील दोन दिवस वगळता नंतर एकही दिवस एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

राज्य शासन व मुंबईच्या टाटा ट्रस्टच्या संयुक्त प्रयत्नाने नागपूरच्या मेडिकलमध्ये ९ सप्टेंबर २०१७ मध्ये देशातील पहिल्या बोनमॅरो नोंदणीची सुरुवात केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाली होती. उद्घाटनानंतर दोन दिवसांमध्ये तब्बल ३५० जणांनी नोंदणी केली गेली, परंतु त्यानंतर हे केंद्र जवळपास बंद झाल्यासारखे आहे. उद्घाटन कार्यक्रमात नागपुरातील एक लाख बोनमॅरो इच्छुक दात्यांची माहिती संकलित करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते.

बोनमॅरो म्हणजे काय?

बोनमॅरो हे हाडांच्या पोकळीतील एक पेशीजाल आहे. त्यात रक्त निर्माण करणाऱ्या पेशी असतात. बोनमॅरो शरीरात सातत्याने रक्तांची भरपाई करत असते. शरीरातील सर्व रक्तपेशींची निर्मिती बोनमॅरोत होते. बोनमॅरो हा रक्त मातृक पेशींचा एक उत्तम साठा मानला जातो. कर्करोग वा तत्सम रोगांमध्ये होणारे ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ हे या तत्त्वावर आधारित असतात. मानवी शरीरात एकूण वजनाच्या चार टक्के बोनमॅरो असते. त्यातून दररोज सुमारे ५०० अब्ज रक्तपेशींची निर्मिती होत असते.

मेडिकलच्या बोनमॅरो नोंदणीसह प्रत्यारोपणासाठी टाटा ट्रस्टकडून काही आर्थिक मदत मिळणार होती, परंतु काही कारणामुळे त्यात व्यत्यय आला. नोंदणीच्या सुरुवातीला प्रतिसाद नसला तरी अटल आरोग्य शिबिरासह इतरही मोठय़ा शिबिरांमध्ये ही नोंदणी वाढवण्याचे  प्रयत्न सुरू आहेत.   – डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

First Published on January 8, 2019 12:42 am

Web Title: what is bone marrow test