05 March 2021

News Flash

पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा; महाजनादेश यात्रेचे दणक्यात स्वागत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने राज्य सरकारने पाच वर्षांत विविध विकास कामे करून शहराचा चेहरामोहरा बदलला. आता ही कामे घेऊनच महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून लोकांचे पुन्हा आशीर्वाद मिळवण्यासाठी जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचभवुन येथे स्वागत सभे दरम्यान केले. संविधान बदलणार नाही, असे त्यांनी संविधान चौकातील स्वागत सभेत सांगितले.

दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान महाजनादेश यात्रा बुटीबोरीहून शहराच्या सीमेत दाखल झाली. चिंचभुवन येथे भाजप कार्यकर्त्यांनी दणक्यात स्वागत केले. महापौर नंदा जिचकार, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह सर्व आमदार व माजी खासदार अजय संचेती, अविनाश ठाकरे उपस्थित होते. जोरदार पावसातही कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. भाजयुमो कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली यात्रेच्या अग्रभागी होती. मुख्यमंत्र्यांचा रथ पोहोचतात ढोल-ताशांच्या निनादात भाजप व मुख्यमंत्र्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांचे छोटेखानी भाषण झाले. राज्य सरकारने पाच वर्षांत विविध विकास कामे केली. शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या कामांमुळे नागपूरचा चेहरामोहरा बदलला. रस्ते, मेट्रोची कामे झाली. या सर्व कामांचा लेखाजोखा घेऊनच आपण जनतेपुढे पुन्हा त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या रोड-शो ला सुरुवात झाली.

बुटीबोरीतही जोरदार स्वागत

बुटीबोरी परिसराला विकास कार्यासाठी आतापर्यंत शासनाने तीन हजार कोटी दिले. येत्या दोन वर्षांत या परिसराचे संपूर्ण स्वरूप आपण बदलवून टाकू, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. यावेळी आ. समीर मेघे, आ. अनिल सोले, आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, आ. मल्लिकार्जून रेड्डी,  माजी खा. दत्ता मेघे, आदी उपस्थित होते.

विविध ठिकाणी वाहतूक विस्कळीत

संविधान चौकातून यात्रा सदर मार्गे येणार असल्यामुळे यात्रा येण्याच्या वीस मिनिटे आधी वर्दळीचा मार्ग असलेल्या लिबर्टी चौकातील वाहतूक थांबवण्यात आली होती. या मार्गावरून यात्रा निघाल्यावर जवळपास २५ मिनिटे वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, एक रुग्णवाहिका या मार्गाने येत असताना पोलीस आणि नागरिकांनी तिला लगेच वाट मोकळी करून दिली. यात्रेतील वाहन ताफ्यामुळे चिंचभुवन चौकात वाहनकोंडी झाली. शहराकडे जाणारी आणि शहरातून बाहेर पडणारी शेकडो वाहने अडकून पडली. दोन्ही बाजूंनी दोन कि.मी. पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात्रा शहरात प्रवेश करण्याची आणि वर्धा मार्गावरील शाळा सुटण्याची वेळ एकच होती. वाहनकोंडीचा सर्वाधिक फटका या मुलांना घेऊन शहरात जाणाऱ्या स्कूलबसेसना बसला. यामुळे मुले वेळेत घरी पोहचू शकली नाहीत.

क्षणचित्रे

* पावसातही भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा होता. हाती पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते दुचाकीवर यात्रेत सहभागी झाले होते. मात्र कोणीही हेल्मेट घातले नव्हते.

* पावसामुळे अनेक नेत्यांनी कारमध्येच बसून यात्रेचे स्वागत करणे पसंत केले. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती कमी होती.

* मुख्यमंत्र्यांची यात्रा पुढे गेल्यावर कार्यकर्त्यांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. ते घेण्यासाठी झुंबड उडाली. हा सर्व प्रकार रस्त्यावरच सुरू होता. त्याचाही वाहतुकीला फटका बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:37 am

Web Title: within five years the face of nagpur has changed abn 97
Next Stories
1 नागपूर लवकरच भारतातील दळवळणाचे प्रमुख केंद्र बनेल
2 महाजनादेश यात्रेदरम्यान फलक बंदी आदेशाचे उल्लंघन
3 श्रीहरीनगरवासी पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत
Just Now!
X