नागपूर : हॉटेलमधील एका वेटरने वस्तीतील १४ वर्षीय सुंदर दिसणाऱ्या मुलीला मुंबईतील देहव्यापारासाठी विकून पैसै कमविण्याची योजना आखली. त्याने मुलीला जाळ्यात ओढून तिला मुंबईला नेले. मात्र, अनैतिक मानवी वाहतूक विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे त्या मुलीचा शोध घेण्यात आला. पिडीत मुलगी आठव्या वर्गात शिकते. ती तुषार नावाच्या युवकाच्या संपर्कात आली. तुषारने तिला जाळ्यात ओढले आणि मुंबईला डान्सबारमध्ये नृत्य केल्यास खूप पैसे मिळतात, असे आमिष दाखवले.
‘मुंबईतली डान्सबारमध्ये कामाला जाणार आहे’ अशी माहिती तिने शाळेतील एका मैत्रिणीला दिली. ११ तारखेला तुषारने तिला मुंबईत डान्सबारमध्ये नेले आणि तेथील एका खोलीत ठेवले. डान्सबारमध्ये पोलिसांचा छापा पडला. त्यामुळे तुषारने त्या मुलीला लगेच तेथून हलवले आणि दुसरीकडे ठेवले. बहीण घरी न आल्यामुळे भावाने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, एएचटीयूच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, उपनिरीक्षक मंगला हरडे, सुनील वाकडे, दीपक बिंदाने, शरीफ शेख, विलास विंचूरकर आणि अश्विनी खोडपेवार यांनी त्या मुलीचा शोध सुरु केला. मुलीकडे असलेल्या मोबाईलमुळे तिचा शोध लागला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले.