लोकसत्ता टीम

नागपूर : पालकांनो… तुमची मुलेसुद्धा मोबाईलवर इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप बघण्यात वेळ गमावतात का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर आताच सावध व्हा. मुलांना मोबाईलचे व्यसन लागण्यापूर्वीच मुलाच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवा. अन्यथा मुलांचा स्वभाव चिडचिडा होऊन किंवा राग अनावर झाल्यावर मुले कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचू शकतात. अशीच एक घटना नागपुरात घडली आहे.

अभ्यास सोडून सतत इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वेळ गमावतो म्हणून आईने १६ वर्षांच्या मुलाला रागावले. आईच्या रागावर त्याने घरातून पलायन केले. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने त्याचा शोध घेतला आणि छत्तीसगडच्या राजनांदगाव येथून ताब्यात घेतले.

आणखी वाचा-नवे महसूल मंत्री म्हणतात, महसूल खात्यात कायद्यात सुधारणा आवश्यक

कळमना हद्दीत राहणाऱ्या ४३ वर्षाच्या महिलेने मुलाला अभ्यास न करता भ्रमणध्वनी बघत असल्यामु‌ळे रागावले. यामुळे त्या मुलाने १२ नोव्हेंबरला दुपारी घरातून पलायन केले. रात्र झाली तरी मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण सापडला नाही. अज्ञात आरोपीने त्याला फुस लावून पळवून नेल्याच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी तांत्रिक तपास करून मुलाचा शोध घेतला. तो छत्तीसगड येथील राजनांदगांव येथे असल्याचे समजले. मुलाचे नातेवाईकही तेथे राहत असल्याचे कळले.

पोलिसांनी तेथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले. त्याचे समूपदेशन केले आणि पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या महिला पोलीस निरीक्षक ललीता तोडासे, सहायक फौजदार राजेंद्र अटकाळे, पोलीस हवालदार सुनील वाकडे, पोलीस अंमलदार ऋषी डुमरे व विलास चिंचुलकर यांनी पार पाडली.

आणखी वाचा-पती ६८ तर पत्नी ६६ वर्षांची; कौटुंबिक वादाने गाठले टोक, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुले असे का वागतात?

आई-वडील आपापल्या कामात व्यस्त असतात किंवा पैसा कमविण्यात व्यस्त असतात. सध्या पालक आणि मुलांमधील संवाद तुटला आहे. एकाच घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांकडे मोबाईल आला आहे. त्यामुळे परस्परांतील प्रेम, आपुलकी संपून दुरावा निर्माण झाला आहे. मुलांसोबत खेळणे, गप्पा करणे किंवा मुलांना पालक वेळ देत नाहीत. त्यामुळे ते मोबाईलवर आपला वेळ गमावतात. त्याची त्यांना सवय लागते आणि त्यांना मोबाईल प्रिय वाटू लागतो. जर मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली किंवा टोकले तर मुलांचा स्वभाव बदलतो. घरातील या वातावरणामुळे मुलांच्या वागण्यातही बदल होतो, अशी माहिती मानसोपचार तज्ञ प्रा. राजा आकाश यांनी दिली.