अमरावती: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) अंतर्गत पीएचडी करणाऱ्या संशोधकांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मागील तीन वर्षांपासून फेलोशिपच्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास ४८० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना संशोधनकार्य करण्यासाठी अधिछात्रवृत्ती लवकरच बहाल करण्यात येणार आहे. याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
सारथी अंतर्गत पीएचडी अधिछात्रवृत्तीकरिता वर्ष २०२२-२३ मध्ये ९६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असता या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचा निर्णय महायुती शासनाच्या वतीने घेण्यात आला. नंतर ९६९ विद्यार्थ्यांपैकी ८१० विद्यार्थ्यांनी सहामाही प्रगती अहवाल सादर करीत संशोधनकार्य सुरु केले. मात्र केवळ ३२४ विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती जमा करण्यात आली. ४८० विद्यार्थ्यांना अजूनही फेलोशिप न मिळाल्याने त्यांचे संशोधनकार्य पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. या संदर्भात सारथी अंतर्गत संशोधनकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमदार सुलभा खोडके यांनी निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
त्याअनुषंगाने सुलभा खोडके यांनी अजित पवार यांना पत्र देऊन छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेअंतर्गत पीएचडी करणाऱ्या संशोधकांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर सारथीसाठी वर्ष २०२५-२०२५ च्या अर्थसंकल्पा मध्ये ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच संशोधनकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित अधिछात्रवृत्ती देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी पुणे येथील सारथी प्रशासनाला निर्देश दिले. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून फेलोशिप मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास ४८० विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल सुलभा खोडके यांनी राज्याचे अजित पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानत अभिनंदन केले आहे.
सारथी संस्थेतील संशोधन विभागाकडून अपेक्षित असणाऱ्या संशोधनाची व्याप्ती सारथीच्या उद्दिष्टांनुसार सीमित व निश्चित करण्यात आली आहे. सारथी संस्था ही मुख्यत्वे लक्षित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचा अभ्यास करून विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व उपायायोजना सुचविण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्तही लक्षित घटकांमधून पात्र उमेदवारांना विविध प्रकारचे संशोधनासाठी सारथी मार्फत मदत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.