चंद्रपूर : चंद्रपूर ते मोहर्ली व मोहर्ली ते चंद्रपूर अशी ४० आसनाची बस सेवा पर्यटकांच्या सेवेत रविवार १ जून पासुन सुरू झाली आहे.आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या सेवेची सुरूवात विधीवत उद्घाटन रविवार १ जून रोजी झाली. ही बससेवा क्रुझर सफारी तिकीटचे बुकिंग आहे त्यांच्यासाठीच आहे. दरम्यान क्रुझरला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद असून दोन वर्षात ५८ हजार पर्यटकांनी क्रुझर मधून ताडोबात जंगल सफारीचा आनंद लुटला आहे.
ताडोबा कार्यालय परिसरात बस सेवेचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह मुख्य वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, ताडोबाचे क्षेत्र संचालक तथा वन संरक्षक डॉ.प्रभु नाथ शुल्का, ताडोबा बफर उपसंचालक कुशाग्र पाठक, सहायक वनसंरक्षक विवेक नातू, वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण गोंड, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महिसकर तसेच वन कर्मचारी उपस्थित होते.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. जगभरातील व देशातील निसर्ग पर्यटक या वनाचा आणि वन्यजीवांचा आनंद उपभोगण्याकरिता या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये येतात. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांना अल्प दरामध्ये या वनाचा आनंद घेण्याकरिता वर्ष २०२३ मध्ये ताडोबात क्रुझर सेवा सुरु करण्यात आली होती. पर्यटकांचा ओघ बघता मोहर्ली गेट मार्फत ४ व कोलारा गेट मार्फत ३ अशा एकूण ७ क्रुझर मार्फत कोर क्षेत्रात पर्यटन सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. या सेवेमार्फत स्थानिक जिल्ह्यातील निसर्ग पर्यटक, सामान्य नागरिक यांना ताडोबा सफारीचा आनंद मनमुराद मिळत आहे.
२०२३ ते २०२५ या दोन वर्षाच्या कालावधीत ५८ हजार निसर्ग पर्यटकांनी या क्रुझरद्वारे ताडोबा सफारीचा अनुभव घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वने व वन्यजीवाविषयी जनजागृती सुद्धा सामान्य नागरीकामध्ये होत आहे हे विशेष. या उपक्रमाची यशस्वीता बघता चंद्रपूर जिल्हातील पर्यटकांना चंद्रपूर ते मोहार्ली येथे सकाळी व दुपार सफारी जाणे-येणे करण्यासाठी अडचण जात होती. ही बाब लक्ष्यात घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीवरून पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहर्ली ४० सीटर बस उपलब्ध करण्यात आली आहे.
या बसमार्फत सकाळच्या सफारीकरिता ४.३० वाजता व सफारी पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजता चंद्रपूर परत येणार त्याचप्रमाणे दुपारच्या सफारी करिता २ वाजता तर परत ७.३० वाजता चंद्रपूर ला पर्यटकांन सोडणार आहे. सदर बससेवा उपसंचालक (कोर) कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वनवसाहत, मुल रोड, चंद्रपूर येथून प्रस्थान करणार आहे. पर्यटकांसाठी चंद्रपुरातून थेट क्रुझरसेवा सुरू झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.