नागपूर: राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया मंगळवार २० मेपासून सुरू झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासह कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीसाठीची प्रक्रिया २० मे ते १६ जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. दहावी निकालानंतर अकरावी, आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, पालकांचे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. मधल्या काळात पॉलिटेक्निक प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. परंतु, दहावीनंतर तीन वर्षांचा पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम पूर्ण करून तब्बल ५८२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना वार्षिक १२.७२ लाख इतका ‘पॅकेज’ मिळवला आहे.

शासकीय तंत्रनिकेतन नागपूर संस्थेच्या शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या अंतिम वर्षाच्या ५८२ विध्यार्थ्यांना ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’द्वारे नामांकीत कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. उच्चशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच तंत्रनिकेतनमधून तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरीच्या उत्तम संधी उपलब्द होत आहेत. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी रोजगारक्षम होतात याची पुन्हा एकदा खात्री पटली आहे. विशेष म्हणजे सुरज कोल्हे, शशांक शास्त्रकार, रुक्मिणी मिश्रा या तीन यांत्रिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक १२.७२ लाख इतका ‘पॅकेज’ मिळवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगार मेळाव्यात कॅरेरो इंडिया लिमिटेड, डिक्सन्स इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, मिंडा इंडस्ट्रीज लिमिटेड अहमदनगर, व्हीई कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड, व्होल्वो ट्रक्स इंडिया विभाग, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड नागपूर, श्रीकॉन्स्ट फॉर्मवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, रत्नइंडिया पॉवर लिमिटेड अमरावती आदी नामांकित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी व मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया राबवली. स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ७४, यांत्रिक अभियांत्रिकी विभागातील १३०, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागातील ५९, विद्युत अभियांत्रिकी विभागातील ८१, धातूशास्त्र अभियांत्रिकी विभागातील १७, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागातील १७५, मायनींग अँड माईन सर्वेयिंग विभागातील ८, पॅकेजिंग टेक्नोलॉजी विभागातील ६ तसेच मेकॅट्रॉनिकस अभियांत्रिकी विभागातील ३२ अश्या ५८२ विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. सर्वाधिक पॅकेज मेकॅनिकाल इंजिनीरिंग च्या विद्यार्थ्यांना १२.७२ लाख रुपये मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाकरिता ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल’चे प्रमुख डॉ. मिलिंद सरोदे, संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोगरे यांचे मार्गदर्शन लाभले.