रागाच्या भरात घरातून बाहेर पडून इतर शहरात जाण्यास निघालेल्या ७४५ मुला-मुलींना मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवरून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ताब्यात घेतले. रेल्वे सुरक्षा दलाचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
रेल्वेने अलीकडेच असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन (एव्हीए) सोबत देशातील रेल्वेमार्गे होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ही संघटना बचपन बचाओ आंदोलन म्हणूनही ओळखली जाते. आरपीएफने ऑपरेशन एएएचटी (मानवी तस्करी विरुद्ध कृती) सुरू केले आहे आणि रेल्वेद्वारे मानवी तस्करी विरोधात कठोर कारवाई केली जात आहे.
…वेळीच लक्षात आले नाही तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त –
अनेकदा अल्पवयीन मुले-मुली काही कौटुंबिक समस्यांमुळे घरातून पळून जात असतात. काही तर चांगले जीवन जगण्यासाठी किंवा मोठ्या शहरातील राहणीमानाच्या आकर्षणातून कुटुंबातील कोणालाही न सांगता पळून रेल्वे स्थानकावर येतात. रेल्वे सुरक्षा दलाच्या वेळीच लक्षात आले नाही तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असते. परंतु आता आरपीएफने प्रशिक्षित जवान फलाटावर तैनात करून अशी मुले-मुली शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षात त्याचे परिणाम देखील चांगले आले आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफने गेल्या सहा महिन्यात ७४५ मुलांना गैरमार्गाला लागण्यापासून वाचवले.
रेल्वे सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत लोहमार्ग पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून जानेवारी २०२२ ते जून २०२२ या कालावधीत विविध रेल्वेस्थानकावरून ४९० मुले आणि २५५ मुलींना ताब्यात घेतले व चाईल्डलाइन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांना सोपवले.
मागील वर्षी ९७१ मुलांना परत त्यांच्या घरी पोहोचवले –
गेल्यावर्षी म्हणजे २०२१ च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफने लोहमार्ग पोलीस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६०३ मुले आणि ३६८ मुलींसह ९७१ मुलांना परत त्यांच्या घरी पोहोचवले.
मुंबई विभागात ३८१ मुले-मुलींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये २७० मुले आणि १११ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागात ५६ मुलांमध्ये ३० मुले आणि २६ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागात १३८ मुलांमध्ये ७२ मुले व ६६ मुलींचा समावेश आहे. पुणे विभागात १३६ मुलांमध्ये ९८ मुले आणि ३८ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागात ३४ मुलांमध्ये २० मुले व १४ मुलींचा समावेश आहे.
आरपीएफ जवानांना दर तीन महिन्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्रशिक्षण –
गेल्यावर्षी मानवी तस्करीची दोन प्रकरणे उघड झाली होती. ती मुले बांगलादेशवरून आणण्यात आली होती. यावर्षी बहुतांश मुले रागातून पळून जाणारी आढळून आली. फलाटावरील अशा मुला-मुलींना ओळखण्यासाठी आरपीएफ जवानांना दर तीन महिन्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाते, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी सांगितले.