बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील टुणकी (तालुका संग्रामपूर) गावाजवळ मजुरांना घेऊन जाणारे मालवाहू वाहन (आयशर ट्रक ) भरवेगात उलटले. या उलटलेल्या वाहनाखाली दबून दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर पाच मजूर गंभीर जखमी झाले. पोटाची भूक भागविण्यासाठी आलेले हे मजूर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
केळी घेऊन जाणारे हे (एमएच ४८ एवाय ४८१५ क्रमांकाचे मालवाहू वाहन काल शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त झाले. यात दोन मजूरांचा आयशर खाली दबून करुण अंत झाला. तसेच पाच मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार केळीने भरलेला आयशर ट्रक बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते अकोट रस्त्याने मजूरांना घेऊन अंजनगाव ( अमरावती ) कडे जात होता. बुलढाणा जिल्ह्यातील टुणकी गावाजवळ या आयशर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.सर्व मजूर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव गावातील असल्याचे सांगितले जात आहे. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ आणि जेसीबीच्या मदतीने सर्व मजूरांना बाहेर काढण्यात आले. पाच गंभीर जखमी मजुरांना उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोटे उप जिल्हा रुग्णालय आणि अकोला येथे उपचारसाठी पाठविण्यात आले . आयशर ट्रक खाली चिरडल्याने दोन मजूरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने घटनास्थळीचे दृश्य भयावह होते. हे दोघेही अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे या घटनेत आयशर ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळताच गावकरी आणि परिसरातील नागरिकांणी घटना स्थळी एकच गर्दी केली. त्यामुळे टुनकी ते सोनाळा दरम्यानची वाहतूक दीर्घ काळ ठप्प झाली. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. टुणकीवरून अकोटकडे जात असताना हे आयशर वाहन टुणकी गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ उलटले. सोनाळा पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करून तातडीने सर्व मजूरांना बाहेर काढले. यामधील दोन मृतक मजूरांच्या मृतदेहाचे वरवट बक्काल ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. पाच जखमी मजूरांना उपचाराकरिता शेगाव व अकोला रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास सोनाळा पोलीस ठाणे करीत आहेत.