भंडारा : एक चिमुकला घरापासून जवळ असलेल्या नहरात मोठा भाऊ आणि कॉलनीतील मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला. मात्र कालव्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात उतरताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना तामसवाडी शिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या नहरात घडली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

तुमसरमधील शिवाजीनगर परिसरातील अल्ताफ शेख (वय ८) असे मृत बालकाचे नाव आहे. अल्ताफ रजा शेख हा त्याचा मोठा भाऊ अहमद व काही मित्रांसोबत शहराच्या बाहेरील तामसवाडी रस्त्याला छेदून गेलेल्या कालव्यात आंघोळीला गेले होते. सर्वजण कालव्यातील पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या अंदाज न लागल्याने मोहम्मद हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोहता येत नसल्याने तो खोल भागात गेला आणि काही क्षणांतच पाण्यात बुडून मृत्यू झाला.

भावाची वाचविण्यासाठी आरडाओरड

लहान भाऊ बुडत असल्याने पाहून त्याच्या मोठ्या भावाने वाचवा वाचवा म्हणून आरडाओरड केली. तोपर्यंत अल्ताफ हा नहरातील पाण्यात बुडाला. यावेळी परिसरात कुणीच नसल्याने या बालकांच्या मदतीसाठी कोणीही येऊ शकले नाही. या घटनेने सोबत असलेली सर्व मुले प्रचंड घाबरली होती. भेदरलेल्या अवस्थेत सर्व मुलांनी घराकडे धाव घेत घडल्या घटनेची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी कालव्याकडे धाव घेतली.

कुटुंबीयांचा आक्रोश

परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत काही वेळातच अल्ताफचा मृतदेह कालव्या बाहेर काढला. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.