अमरावती : जयस्तंभ चौक परिसरातील कोतवाली ठाण्यासमोर असलेल्या एका खेळणीच्या दुकानाला रविवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दुकानातील खेळणे व अन्य साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अथक परिश्रम करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

रामपुरी कॅम्प परिसरातील कृष्णानगर येथील रहिवासी विजय बजाज यांचे जयस्तंभ चौक-श्याम चौक मार्गावर बजाज खिलोना सेंटर नावाचे खेळणी विक्रीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी त्यांच्यासह कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी दुकानातील वरच्या माळ्यावर अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच विजय बजाज यांच्यासह कर्मचारी दुकानाबाहेर पडले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्याचवेळी आगीने रौद्ररुप धारण केले. दुकानाच्या वरच्या माळ्यावरून आग खालच्या माळ्यावर पसरली. त्यामुळे दुकानातून आगीचे प्रचंड लोळ निघू लागले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अथक परिश्रमाअंती अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत या आगीत दुकानातील खेळणे व अन्य साहित्य पूर्णत: जळून खाक झाले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या आगीची शेजारी असलेल्या इतर खेळणी विक्रेत्‍यांच्‍या दुकानांना काही प्रमाणात झळ बसली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खबरदारीचा उपाय म्‍हणून या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्‍यात आला होता. आगीचे नेमके कारण कळू शकले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा – काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका

हेही वाचा – नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्‍या सप्‍टेंबर महिन्‍यात बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्‍या कारखान्‍याला भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्‍यात आल्‍यानंतर पथकाने तातडीने घटनास्‍थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले होते. या कारखान्‍यात खाद्यतेलाचा साठा असल्‍याने आग पसरण्‍याचा धोका निर्माण झाला. सुरुवातीला एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठा बंद करण्‍यात आला आणि त्‍यानंतर उच्‍च दाबाच्‍या बंबांमधून पाणी फवारण्‍यात आले होते.