नागपूर: जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेले विशाल थिएटर नागपुरात साकारणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असेल. आधुनिक काळात मनोरंजन क्षेत्रातील चमत्कार असेल.

मुंबईत झालेल्या वेव्हज २०२५ समीटमध्ये यासंदर्भात एक करार झाला. चित्रपट अभिनेते अभिषेक अग्रवाल आणि अभिषेक रेड्डी यांच्या उपस्थितीत वरील घोषणा करण्यात आली. जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेले थिएटर उभारणे ही आमच्यासाठी संधी आहे, असे अग्रवाल यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय मनोरंजन क्षेत्राला जागतिक दर्जाचे करण्याचा संकल्प केला आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहे. सर्वात मोठे स्क्रीन असलेले थिएटर उभारणे हा त्याच दिशेने केलेले प्रयत्न आहेत. याची जबाबदार आमच्यावर टाकली यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारी आहोत, असे अग्रवाल म्हणाले.

युव्ही क्रिएशन्स मध्ये चित्रपट निर्मिती करण्यापासून तर विशाल थिएटर उभारणी पर्यंत चित्रपट क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी आमचे सदैव प्रयत्न करीत आहोत. नागपुरात जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनचे थिएटर उभारणीसाठी आम्ही सर्व कौशल्य पणाला लावू.ज्यातून बरेच काही उत्तम साध्य होईल. एक उद्योग म्हणून चित्रपट क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आमच्या क्षमतेवर विश्वास दाखवल्या बदल पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे आभार, अशी भावना विक्रम रेड्डी यांनी व्यक्त केली.

नागपूर मध्ये चित्रपट नगरी ज्ञ उभारण्याची घोषणा यापूर्वी राज्य शासनाने केली आहे. रामटेक तालुक्यातील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असून येथे दळणवळणाच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. शहरात ऐकीकाळी २६ चित्रपट गृहे होती आता ती बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिली आहे. सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघणा-यांची संख्या घटली आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेले थिएटर उभारले जात आहे.