गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वाढती गुन्हेगारी आणि काही पोलीस निरीक्षकांची अकार्यक्षमता लक्षात घेता लवकरच शहर पोलीस दलात मोठे फेरबदल होणार आहेत. काही ठाणेदारांची गच्छती होणार आहे तर काहींना पहिल्यांदाच ठाणेदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनेक नवीन चेहऱ्यांना ठाणेदार म्हणून संधी दिली. मात्र, काहींनी त्या संधीचे सोने न करता थेट ‘अर्थपूर्ण’ उपक्रमावर भर दिला. तसेच काही ठाणेदारांनी पदभार घेताच भूमाफिया, सुपारी व्यापारी, धान्य व्यापारी, जुगार अड्डे संचालक, वरली-मटका जुगारी, सट्टेबाजी, गोतस्कर, रेती वाहतूकदार, दारूविक्रेते आणि अवैध धंदेचालकांशी हातमिळवणी करीत पोलीस आयुक्तांच्या उद्देशाला फाटा दिला आहे. प्रतापनगर, हिंगणा, जरीपटका, लकडगंज, गिट्टीखदान, तहसील भागात किरकोळ प्रकरणातसुद्धा पोलीस सामान्य नागरिकांना ‘वेठीस धरल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा घटनांमुळे पोलीस आयुक्तांनी गुन्हे आढावा बैठकीत अनेकांची कानउडघडणी केली होती. शहरात अवैध धंदे खपवून घेणार नाही, असे आदेश असतानाही काही पोलीस अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. तर काही ठाणेदारांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे बदल्या होणार आहेत. त्यामध्ये मानकापूर, लकडगंज, बेलतरोडी, सीताबर्डी, सोनेगाव, पाचपावली, कोतवाली, सक्करदरा ठाण्याचा समावेश आहे.

हेही वाचा >>>केसीआर यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, ‘बीआरएस’ गडचिरोलीतून लढणार विधानसभा; माजी आमदार लागले गळाला

काही पोलीस ठाण्यातील कर्मचारी निरीक्षकांच्या आशिर्वादाने अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करीत असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. तसेच प्रत्येक पोलीस उपायुक्त कार्यालयात वर्षानुवर्षे असणारे विशेष पथकातील कर्मचारी कारवाई ऐवजी ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष नियंत्रण नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका लक्षात घेता लकरच पोलीस निरीक्षकांच्या ‘जम्बो’ बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>>आमदाराने मध्यरात्री छापा टाकत उघडकीस आणली वाळू तस्करी, वाचा कधी आणि कुठे ते…

गुन्हे शाखेला नव्या झळाळीची गरज
पोलीस आयुक्तांचा विश्वास सार्थ ठरवणाऱ्या गुन्हे शाखेत सध्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हफ्ता वसुलीचे आरोप होऊ लागले आहे.. तसेच वाहतूक शाखेच्या काही निरीक्षकांनी वसुलीसाठी विशेष कर्मचारी निवडून पथक स्थापन केल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुन्हे आणि वाहतूक शाखेत नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची गरज निर्माण झाली आहे.