यवतमाळ : नवीन इलेक्ट्रिक मीटर बसविण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला भोवले. ही रक्कम स्वीकारताना तंत्रज्ञास रंगेहात अटक करण्यात आली. आर्णी मार्गावरील सहकार भवनजवळ झालेल्या या कारवाईने वीज वितरण वर्तुळात खळबळ उडाली. गजानन मारोतराव भोयर (३५, रा. विश्वासनगर, वडगाव रोड), असे लाचखोर कर्मचार्याचे नाव आहे. तो वडगाव येथील वीज वितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहे.
यवतमाळ येथील रेणुकानगर, दांडेकर ले-आउटमधील तक्रारदार तरुणाला नवीन वीजमीटर बसविण्यासाठी गजानन भोयर याने ४५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मंगळवारी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सहकार भवन बाजूला असलेल्या स्वामी अॅक्वाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच भोयर याला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा – नागपूर : विवाहितेची आत्महत्या; मैत्रिणीचा पैशांसाठी तगादा
याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात लाचखोर कर्मचार्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमित वानखडे, विनायक कारेगावकर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, इफराज काजी आदींनी केली.