भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) वैद्यकीयतील पदवी-पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केल्यावरही नागपूरच्या मेडिकलमधील विद्यार्थ्यांनी त्याला पाठ दाखवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याची दखल घेत बायोमेट्रिकवर हजेरी नसलेल्यांना परीक्षेतून बाद करण्याचे संकेत दिले आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थी-महाविद्यालय-विद्यापीठ असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

शासनाकडून वैद्यकीय शिक्षणावर कोटय़वधींचा खर्च केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांना त्याचे गांभीर्यच नसल्याचे वेळोवेळी दिसून येते. नागपूरच्या मेडिकल, मेयोसह अनेक संस्थेतील एमबीबीएस (पदवी) व एमडी/ एमएस (पदव्युत्तर) अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी नियमितपणे वर्गात उपस्थित राहात नाही. त्यामुळे एमसीआयने विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आवश्यक केली. त्यानुसार विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, लता मंगेशकर रुग्णालय, नागपूरच्या मेडिकलमध्ये बायोमेट्रिक मशीनही लावण्यात आली. या यंत्रणेवर दिल्लीतील एमसीआयचेच नियंत्रण आहे.

विदर्भातील खासगी संस्थेत बायोमेट्रिक सुरू असले तरी नागपूरच्या मेडिकलमध्ये मार्ड संघटनेने सुरुवातीपासून त्याला विरोध केला व या हजेरीकडे पाठ फिरवली. मात्र, आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मेडिकल प्रशासनाला ईमेलद्वारे विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची असल्याचे सांगून या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरीनुसार गैरहजर दिसून आल्यास परीक्षेला मुकावे लागेल असे कळविले आहे. मेडिकल प्रशासनाने ही माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यानंतरही विद्यार्थी बायोमेट्रिक नोंद करण्यास तयार नाही. त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ नित्याने विविध संस्थांकडूनच विद्यार्थ्यांच्या हजेरीची माहिती घेते. या विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक हजेरी न लावल्यास त्यांना परीक्षेतून बाद करण्याबाबत अद्याप धोरणात्मक निर्णय झाला नाही, परंतु भारतीय वैद्यक परिषदेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावायला हवी.   डॉ. कालिदास चव्हाण, प्रकुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.

मेडिकलला आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या सूचना केल्या आहे. विद्यापीठाच्या या ईमेलवर प्रसंगी विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून परीक्षेला बसू न देण्याचे संकेत असल्यामुळे त्याची सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावून अनुचित प्रकार टाळण्याची गरज आहे – डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबतचे नियम

  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या नियमानुसार प्रत्येक महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रात ७० टक्केहून जास्त उपस्थिती आवश्यक आहे. कमी असेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येत नाही.
  • मेडिकलमधून सध्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद पारंपरिक पद्धतीने आरोग्य विद्यापीठाकडे पाठवली जाते. ती बायोमेट्रिक नोंदीवर पडताळल्यास येथील विद्यार्थी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.