लोकसत्ता टीम
यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. शहरातील कळंब चौक परिसरातील ऑटो चालकाची मुलगी अदिबा अनम अशफाक अहमद या विद्यार्थिनीने संपूर्ण भारतातून १४२ वी रँक प्राप्त केली आहे. तर, शहरातील दारव्हा मार्गावरील महावीर नगरातील शिक्षक शंकर आडे यांचा मुलगा डॉ. जयकुमार शंकर आडे यांनी ३०० वी रँक मिळविली आहे.
यवतमाळ येथील अबिदा अनम अश्फाक अहमद हिला संपूर्ण भारतातून १४२ वी रँक मिळाली आहे. ती यवतमाळ येथे कळंब चौकात मोठे वडील मुस्ताक अहमद यांच्याकडे राहते, त्यांचे स्वत:चे मालकीचे घर सुद्धा नाही. ती शायर अश्फाक शाद यांची मुलगी आहे. ते भाड्याने ऑटो चालवितात. अदिबाचे प्राथमिक शिक्षण जफरनगर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधून झाले. अकरावी-बारावी विज्ञान शाखेत जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट ज्युनिअर कॉलेज यवतमाळ येथून पूर्ण केले. बी. एससी. गणित या विषयात आबदा इनामदार सिनिअर कॉलेज पुणे येथून पूर्ण केले. त्यानंतर युनिक अकॅडेमी पुणे येथून यूपीएससीचे फाउंडेशन कोचिंग घेतले. त्यानंतर पहिला प्रयत्न मुंबई हज हाउस आयएस प्रशिक्षण संस्थेमधून केला, दुसरा हमदर्द स्टडी सर्कलमधून, तसेच तिसरा व चौथा प्रयत्न जामीया मिलिया इस्लामिया प्रशिक्षण संस्था न्यू दिल्ली येथून केला. चौथ्या प्रयत्नात तिला यश मिळाले आणि स्वप्न पूर्ण झाले असे अदिबाने सांगितले.
‘मला डॉक्टर व्हायचे होते, पण…’
अदिबा म्हणते की, ‘मला डॉक्टर व्हायचे होते. परंतु, सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने शक्य झाले नाही. त्यामुळे मी खचले होते. परंतु, यवतमाळ येथील सेवा एनजीओ या संस्थेचे सेक्रेटरी निजामुद्दीन शेख यांनी प्रेरणा दिली. त्यांनी आयएएस करून समाजाची, देशाची सेवा कशी करता येऊ शकते याबद्दल माहिती दिली. त्यांनी प्रोत्साहित केले आणि मी यूपीएससी करण्याचा निर्धार केला. माझ्या यशाची माहिती जेव्हा माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.
शिक्षकाच्या मुलाचे यश
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत लासीना येथील प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक असलेल्या शंकर आडे यांचा मुलगा डॉ. जयकुमार आडे यांनी तिसर्या प्रयत्नात ध्येय गाठले. अगदी लहानपणापासून आयएएस करण्याचे स्वप्न बाळगलेल्या डॉ. जयकुमार यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावरही जिद्द सोडली नाही. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३०० वी रँक मिळविली. डॉ. जयकुमार यांचे प्राथमिक शिक्षण येथील आरकेएस पब्लिक स्कूल यवतमाळ येथून झाले. तर दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ पब्लिक स्कूलमधून झाले. अकरावी व बारावी विज्ञान शाखेतून आरएलटी कॉलेज अकोला येथून केले. तर, एमबीबीएस बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे येथून केले. सध्या ते अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून फिजिओलॉजीमधून एम.डी. करीत आहेत.
एमबीबीएस झाल्यावर डॉ. जयकुमार आडे यांनी नेर पंचायत समितीमधील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. त्यानंतर घरूनच यूपीएससी परीक्षेची ऑनलाइन तयारी केली. तिसर्या प्रयत्न त्यांना यश आले. वडील प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे. दोन बहिणी आहेत. डॉ. जयकुमार यांचे ध्येय आयएएस करण्याचे होते, ते त्यांनी पूर्ण केले, असे त्यांचे वडील शंकर आडे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात यूपीएससी परीक्षेचे क्लासेस, परीक्षेचे वातावरण नसताना विद्यार्थी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यात यशस्वी होत असल्याने, अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.