अकोला : मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अखेर अकोला रेल्वेस्थानकावर १ सप्टेंबरपासून थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अकोलेकरांची १६ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. दुरांतोला अकोल्यात थांबा देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे मंत्रालयात प्रयत्न केले. त्याला आता यश आले आहे. मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या प्रवाशांना जलद प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेस अकोला रेल्वेस्थानकाला ‘बाय-बाय’ करून धावत होती. या गाडीला अकोल्यात थांबा देण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. त्यानुसार गाडी क्रमांक १२२६१ / १२२६२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोला जंक्शन रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. हा थांबा १ सप्टेंबर २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील. गाडी क्र. १२२६१ मुंबई ते हावडा दुरांतो एक्सप्रेस अकोला येथे मध्यरात्री ००:४० वाजता येईल आणि ००:४२ वाजता पुढे रवाना होईल.

गाडी क्र. १२२६२ हावडा ते मुंबई दुरांतो एक्सप्रेस अकोला येथे रात्री २३:५३ वाजता पोहोचेल आणि २३:५५ वाजता सुटेल. आठवड्यातून चार दिवस धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसला अकोला येथे थांबा मिळाल्याने प्रवाशांना मुंबई आणि हावडा येथे जाण्यासाठी जलद व कमी थांब्यात पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. हावडा-मुंबई दुरांतो एक्सप्रेस २८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झाली होती. या गाडीला अकोल्यात थांबा मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी होती. तेव्हापासून या गाडीला अकोल्यात थांबा देण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीने चांगलाच जोर पकडला होता. आता सुमारे १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या गाडीला अकोल्यात थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी खा. अनुप धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मंत्रालयाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानंतर या गाडीला थांबा मिळाला.

प्रवाशांना मोठा दिलासा

अजनी – पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला अकोल्यात थांबा मिळाल्यानंतर आता उद्यापासून दुरांतो एक्सप्रेस देखील येथे थांबणार आहे. या गाडीच्या थांब्यामुळे मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. कमी वेळ व थांब्यात प्रवाशांना मुंबई आणि हावडा येथे पोहोचणे शक्य होईल.