नागपूर: राज्यात महिलांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात महिलांविरुद्ध गुन्ह्यांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर उत्तरप्रदेश तर दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो, ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जारी केलेल्या अहवालावरून समोर आली आहे. महिलांवरील गुन्ह्यात सर्वाधिक गुन्हे मुंबई आणि पुणे शहरात दाखल झाले असून तिसऱ्या क्रमांकावर नागपूर शहर आहे.

राज्य सरकारने महिला व वृद्धांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात घट व्हावी म्हणून सरकारने विशेष प्रयत्न केल्याचा दावा केला होता. मात्र, एनसीआरबीच्या अहवाल प्रकाशित होताच सरकारचा दावा सपशेल फोल ठरला आहे. गेल्यावर्षी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक होता तर यावर्षीच्या अहवालात राज्याचा चक्क दुसरा क्रमांक आहे. उत्तरप्रदेशात सर्वाधिक (६५७४३) गुन्हे दाखल आहेत तर महाराष्ट्रात (४५३३१) गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या स्थानावरील राजस्थानात (४५०५८) गुन्हे दाखल आहेत. देशात ३१ हजार ५१६ लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यात पहिल्या स्थानावर राजस्थान (५३३९९) तर दुसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश (३६९०) तर मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्र (२९०४) चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा… आज विदर्भासह मराठवाड्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना “यलो अलर्ट”

देशातील ३१ हजार ९८२ महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. अल्पवयीन मुलींवरही राज्यात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नातेवाईक, प्रियकर, कुटुंबातील सदस्यांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची माहिती अनेक घटनांमधून समोर आली आहे. तसेच मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून किंवा अश्लील छायाचित्र- चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करून लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत सर्वाधिक लैंगिक अत्याचार

देशातील १ हजार १७ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला असून उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. राज्यात मुंबईत महिलांवर सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तब्बल ३७० महिलांवर लैंगिक अत्याचार झाला असून त्या पाठोपाठ पुण्यात ३०७ महिलांवर बलात्कार झाला असून तिसऱ्या क्रमांकावर नागपूर शहर असून २५१ महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद घेण्यात आली.