नागपूर: बंगालच्या उपसागरातील “मिचॉंग” चक्रीवादळामुळे तामिळनाडू व आंध्रप्रदेशच नाही तर महाराष्ट्र देखील कमीअधिक प्रमाणात प्रभावित होणार आहे. विदर्भासह मराठवाड्याला आज (मंगळवारी) पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉंग’ चक्रीवादळामुळे तामिळनाडू राज्यात हाहाकार माजला असून आंध्रप्रदेशात देखील या चक्रीवादळाची तीव्रता दिसून येत आहे. महाराष्ट्रात सोमवरपासूनच ढगाळ वातावरण असून पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. आज, सोमवारी पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात सुद्धा काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हेही वाचा… चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या या गाड्या रद्द
बंगालच्या उपसागरातील “मिचॉंग” चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टी व लगतच्या राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर नैऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तामिळनाडू व आंध्रप्रदेश या दोन राज्यांसह महाराष्ट्रावर देखील त्याचा परिणाम जाणवत आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.