लोकसत्ता टीम

नागपूर : पुण्यात गुइलेन- बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या वाढली असतांनाच नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) या आजाराचे रुग्ण दाखल असल्याची धक्माकादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.

नागपुरातील मेडिकलच्या औषधशास्त्र विभागात सध्या विविध आजारांचे एकूण चारशेच्या जवळपास रुग्ण दाखल आहे. त्यापैकी ५ रुग्ण हे गुइलेन बॅरे सिंड्रोमचे आहे. पाचपैकी तीन रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर दोघांवर सामान्य वार्डात उपचार सुरू असल्याची सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मेडिकलमध्ये या आजाराच्या दाखल रुग्णांची ही सामान्य संख्या असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. त्यामुळे तुर्तास काळजी करण्याची गरज नसल्याचा मेडिकलच्या डॉक्टरांचा दावा आहे. परंतु पुण्याची या आजाराच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघता वैद्यकीय क्षेत्रात मात्र या आजाराच्या प्रसाराबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहे. तर मेयो रुग्णालयात मात्र या आजाराचा एकही रुग्ण दाखळ नसल्याचा तेथील प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान या आजाराचे वेळीच निदान व उपचार केल्यास रुग्ण पूर्णपने बरा होत असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे.

आजार काय?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा चेतासंस्थेशी निगडित विकार आहे. त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातपायाला मुंग्या येणे अथवा ते बधीर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळजी काय घ्यावी?

  • पाणी पिण्याआधी उकळून घ्या.
  • भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा.
  • चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा.
  • अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका.
  • जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा.
  • खाण्याचे भांडे अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाणघेवाण करू नका.
  • कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा.
  • स्वयंपाकघराचा ओटा आणि भांडी निर्जंतूक करून घ्या.

पुणे परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे किती रुग्ण?

पुणेसह इतरत्र सध्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे ६७ रुग्ण नोंदवण्यात आले आहे. त्यापैकी ३९ रुग्ण पुणे ग्रामीण, १३ रुग्ण पुणे महापालिका, १२ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका, ३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण रुग्णांपैकी १३ रुग्ण हे सध्या जिवनरक्षण प्रणालीवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचा दावा आहे. एकूण रुग्णांमध्ये ४३ पुरूष तर २४ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक १५ रुग्ण हे ६० ते ६९ वयोगटातील आहे.