नित्याच्या आंदोलनाला कंटाळलेल्या भाजप नगरसेवकांचा सवाल

नागपूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून स्थानिक भाजपकडून  राज्य सरकारच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन सत्र व त्यासंदर्भातील बैठका यातच वेळ जात असल्याने प्रभागातील कामांकडे लक्ष द्यायचे कधी, असा सवाल  भाजप नगरसेवक उपस्थित करीत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकार विरोधात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन, मोर्चे, निदर्शने  याचे सत्र सुरू केले आहे. त्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना आंदोलनात जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी सोपवली जाते. गेल्या महिन्यांपासून दर आठवडय़ात किंवा तीन दिवसाआड एक तरी  आंदोलन होत आहे. आंदोलनाचे कारणही अतिशय क्षुल्लक असते. याला आता नगरसेवक व पदाधिकारी कं टाळल्याची प्रतिक्रिया हळूहळू व्यक्त होत आहेत.

ओबीसींचे आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे जिल्हा व तालुका पातळीवर आंदोलन, ओबीसी जागर अभियानाचा समारोप, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनांचे अनुदान मिळावे यासाठी मोर्चा, रमाई घरकुलाच्या निधीसाठी आंदोलन, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्यामुळे रामगिरीसमोर निदर्शने, नवाब मलिक, सलमान खुर्शीद ,पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करण्यासाठी, विकास शुल्क वाढीच्या विरोधात, केशरी कार्ड धारकांना धान्यपुरवठाा अशा विविध कारणांवरून सध्या भाजप रोज रस्त्यावर उतरत आहे. वारंवार होत असलेल्या या आंदोलनांमुळे पक्षांतर्गत विद्यमान सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अनुपस्थिती कमी होऊ लागली आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून विद्यमान नगरसेवकांचा अभ्यासवर्ग, प्रभाग पातळीवर बैठका आयोजित केल्या जात आहे. याला नगरसेवक व पदाधिकारी कं टाळले आहेत. या विरोधात उघडपणे ते बोलत नसले तरी खाजगीत मात्र त्रागा व्यक्त करीत आहेत.

दोन महिन्यावर सार्वत्रिक निवडणुका आहेत. करोनामुळे दीड वर्षांचा काळ प्रभागात कोणतेही विकास कामे न करता गेला आहे. त्यामुळे लोकांचा रोष आहे. शिल्लक कार्यकाळात जास्तीत जास्त विकास कामे करण्यावर नगरसेवकांचा भर आहे. अशा व्यस्ततेत आंदोलनाचे सत्र सर्वासाठी अडचणीचे ठरू लागले आहे. पक्षाने याची दखल घ्यावी, असे  आता नगरेवक व पदाधिकारी बोलू लागले आहेत.

ऑक्टोबरपासून झालेली आंदोलने

  • ओबीसीचे आरक्षण
  • ओबीसी जागर अभियानाचा समारोप
  • नियमितीकरण शुल्कवाढीविरुद्ध मोर्चा
  • नागपूर सुधार प्रन्यास सभापतींना घेराव
  • रामगिरीसमोर आंदोलन
  •   नवाब मालिक यांच्या विरोधात आंदोलन
  •   सलमान खुर्शीद विरोधात आंदोलन
  •   पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
  •   केशरी कार्ड धारकांना अन्नधान्याचा पुरवठा बंद केल्यामुळे मोर्चा

गेल्या दीड वर्षांत लोकांशी नगरसेवकांचा संपर्क  नव्हता. आंदोलनामुळे ही संधी नगरसेवकांना मिळाली आहे. त्यामुळे एखाद दुसरा नाराज असू शकतो पण ती नाराजी सार्वत्रिक नाही. कारण प्रत्येक आंदोलनाला नगरसेवकांची उपस्थिती असते. ’’

अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, भाजप, महापालिका.