अकोला : राज्यात सध्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट ओढवले आहे. आतापर्यंत ६३ लाख ५१ हजार ५२० हेक्टरवर नुकसान झाले. राज्यातील एकही अतिवृष्टीबाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सुमारे सहा हजार कोटी, कृषी समृद्धी योजनेसाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित शिवार फेरी व चर्चासत्राच्या उद्घाटनाला ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल, खा.अनुप धोत्रे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. किरण सरनाईक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, नागपूर येथील पशुसंवर्धन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील आदी उपस्थित होते.

नवे तंत्रज्ञान, साधने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. बदलते पर्यावरण, वेळोवेळी येणारी नैसर्गिक संकटे अशी आव्हाने शेती क्षेत्रासमोर आहेत. या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती, पूरक व्यवसायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पिकाला चांगला बाजारभाव मिळावा, नैसर्गिक संकटातही किफायतशीर शेतीपद्धती निर्माण होण्यासाठी संशोधन व प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली.

कृषी विद्यापीठाचे नवनवीन वाणांचे संशोधन पुढे आणले आहे. त्याची माहिती व लाभ शिवार फेरीत शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांच्या शंकांचे निराकरण चर्चासत्राच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे कृषिमंत्री म्हणाले.

‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना शासन राबवत असून, विविध योजना-उपक्रमांसाठी तरतुद वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने होतो. कृषी क्षेत्रात ‘एआय’ सारखे अद्ययावत तंत्रज्ञान विविध बाबतीत उपयोगात आणले जावे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधनांबरोबरच उपक्रमांना चालना देण्याची गरज आहे, असे आशिष जयस्वाल यांनी सांगितले. खासदार अनुप धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. कुलगुरु डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात दिली. डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.

कृषिमंत्र्यांची विद्यापीठात शिवार फेरी

कृषिमंत्र्यांनी शिवार फेरीतील थेट प्रात्यक्षिकांची पाहणी केली व विविध प्रयोगांची माहिती जाणून घेतली. कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील गांडूळ खत, साहिवाल गो संवर्धन प्रकल्प, भाजी, फुले, फळ संशोधन प्रकल्प तसेच विविध विभागांच्या संशोधन प्रकल्पांना भेट दिली.