नागपूर : ऐन दिवाळी समोर असताना शहरातील विविध भागांतून घरफोडी, वाहने चोरीच्या गुन्ह्यांना बळी पडत कोट्यवधींच्या मालमत्ता गमावून बसलेल्या २०० हून अधिक नागरिकांना पोलिसांकडून शनिवारी सुखद गिफ्ट देण्यात आले. नागरिकांच्या चोरीला गेलेल्या एकूण १कोटी ६० लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी सुखरूप हस्तांतरित केला. विशेष म्हणजे राज्याच्या सीमा ओलांडून उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये परागंदा झालेल्या या चोरांच्या पोलिसांनी परराज्यातून मुसक्या बांधल्या.
यात एकट्या परिमंडळ एक मधून ८७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द केला. तर परिमंडळ दोन मध्ये ४८ लाख आणि परिमंडळ पाच मध्ये २४ लाख आशा एकूण १ कोटी ३९ लाखांच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. यावेळी पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके, परिमंडळ पाच हद्दीत पोलीस स्टेशन कळमना, पारडी, यशोधरानगर आणि वाठोडा पोलिसांनी ५१ मोबाईल फोन परत केले.. या सोबतच १२ दुचाकी वाहन अशी २४ लाख किमतीच्या वस्तू नागरिकांना परत केल्या. परिमंडळ २ मधिल पोलिस स्टेशन धंतोली, सीताबर्डी, सदर इमावाड, अंबाझरीमधुन १९२ भ्रमणध्वनी तर १० दुचाकी असा ४८ लाखांचा मुद्देमाल परत केला. परिमंडळ १ मधून ५१ गुन्हे उघडकीस आले. या मधील ४२ दुचाकी वाहने, २३ तोळे सोने आणि ११ भ्रमणदूरध्वनी अशा एकूण ८७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल परत केला.
चेहऱ्यावर उमटले आनंदाचे भाव
गुन्हे उघडकीस आणत चोरीचा माल पुन्हा नागरिकांकडे सुपूर्द करण्याची ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचा आणि पारदर्शक कामकाजाचा उत्तम आदर्श ठरली आहे. आपली हरवलेली मौल्यवान मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव उमटले. दिवाळीच्या मुहूर्तावर मिळालेली ही विशेष भेट नागरिकांसाठी दिलासादायक तर पोलिसांप्रती विश्वास वाढवणारी ठरली आहे.