वर्धा: जो आपल्या मनात ठसला, रात्रंदिवस ज्याची प्रतिमा जपतो, त्याची प्रत्यक्ष भेट घडली तर होणारा आनंद गगनात मावेनासा. तसेच अजय मोहिते या यू ट्यूबर व इनफ्लूएणझरबाबत घडले. पुष्पा चित्रपट कमालीचा गाजला. त्यातील दाक्षिणात्य नट अल्लू अर्जुन हा सर्वत्र लोकप्रिय झाला. त्याचीच चेहरेपट्टी असलेला वर्धेकर अजय मोहिते याने पण मग पुष्पा साकारणे सूरू केले.

अजय मोहिते हा तसा आधीच इंस्टाग्राम व अन्य समाज माध्यमावर लोकप्रिय झालेला आहे. त्याच्या व्हिडीओची संख्या अडीचशेवर असून त्यास लाखोंचा प्रतिसाद लाभला आहे. या लोकप्रियतेमूळे अजयला देशाच्या विविध भागातून निमंत्रण येत असतात. त्याची संपूर्ण वाटचाल लोकसत्ताच्या विदर्भ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.

तर अजयची पुष्पा प्रतिमा चांगलीच लोकप्रिय झाली. त्याला गावात पुष्पभाऊ याच नावाने हाक मारल्या जाते. याच अजयला मग खऱ्या पुष्पास भेटण्याची ओढ लागली. पण भेटायचे कसे, हा लाखमोलाचा सवाल होता. अखेर हिंमत करीत अजय दोन मित्रासह गाडीने थेट हैद्राबादकडे निघाला. अल्लू अर्जुन यांच्या घरापुढे ठाण मांडले. तासाभरात अर्जुनची गाडी घराकडे येत असल्याचे पाहून अजयने धाव घेतली पण बाउन्सरनी त्याला दूर सारले. घरातून परत अर्जुन ऑफिसकडे जायला निघत असतांना परत तोच अनुभव आला. पण जिद्द ठेवून अजयने आपली पण गाडी मागोमाग ठेवून पाठलाग करीत अल्लू अर्जुनचे ऑफिस गाठले. मागेच लागला म्हणून मग एका बाउन्सरने अजयशी संवाद साधला. तुझी सायंकाळी भेट घालून देतो अशी खात्री दिली.

तेथून परत येत अजयने मग अल्लू अर्जुन यांच्या घरापुढे ठिय्या दिला. तेवढ्यात अल्लू अर्जुन यांचे वडील व प्रसिद्ध दिग्दर्शक अरविंद अल्लू हे घरी गाडीत बसून येत असल्याचे दिसले. त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा खरोखर एखादी ईच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करतो, तेव्हा देव पण मदतीस धावतो असे म्हटल्या जाते. अजयला त्याचा प्रत्यय आला. काही वेळ गेल्यानंतर अरविंद अल्लू यांनी अजयला घरात बोलावले. विचारपूस करीत जेवला कां म्हणून विचारणा केली. एव्हड्या मोठ्या माणसाने त्या प्रासादतुल्य घरात बोलावून भेट दिली याच आनंदात असलेला अजय भूक विसरून गेला. पण दोन वेळा त्यांनी विचारणा केल्यावर जेवलो नसल्याचे उत्तर अजयने दिले आणि लगेच अरविंद अल्लू यांनी खास बिर्याणी बोलावली. ती खाऊन तृप्त झालेल्या अजयने मग अल्लूसोबत भेटण्याची ईच्छा व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायंकाळी परत अल्लू अर्जुन गाडीने येत असल्याचे पाहून अजय हरखला. त्याने बाहेरील गर्दीतून हात उंचावले. नजरभेट झाली. आणि गाडी आंत जातच गेट बंद झाले. काही वेळ हिरमुसल्या अवस्थेत असलेल्या अजयला मग जणू देव पावला. आंत येण्याचे निमंत्रण मिळाले अन जीवाशीवाची भेट अखेर घडलीच. जन्म सार्थकी लागल्याची त्यावेळी भावना झाल्याचे अजय लोकसत्ताशी बोलतांना म्हणाला. बाजूला उभ्या बाउन्सरने त्याच्या मोबाईलमधील अजयचे प्रोफाइल अल्लू अर्जुन यांना दाखविले. ते पाहून खुश झालेल्या अर्जुन यांनी मग अजयला डायलॉग मारण्यास सांगितले. थोडा डान्स पण झालं. कृतकृत्य झाल्याच्या भावनेतील अजयने सोबत आणलेला चरखा अर्जुन यांस भेट दिला. मोठा कलाकार होशील, असा आशीर्वाद अजयला मिळाला. मोठी माणसं पण पाय जमिनीवर असल्याचा अनुभव आल्याचे अजय सांगतो. भेट झाली आणि अर्जुन यांच्या घराकडे शेवटीची नजर टाकत अजय मोहिते उर्फ वर्धेकर पुष्पा गावाकडे निघाला.