नागपूर: तीन दिवसापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात पक्ष बळकट करण्याचा संकल्प करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे, तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवले आहे.
गुजर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. पक्षात फूट पडल्यावर ते अजित पवार गटात गेले. तेथे त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले. १९ सप्टेंबर ला नागपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात त्यांचा सहभाग होता.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळण्यासाठी जिल्हा अध्यक्षांनी प्रयत्न करावे, असे आवाहन शिबिरात करण्यात आले होते. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असताना अचानक गुजर यांनी राजीनामा दिला. राजीनामा पत्रात त्यांनी व्यक्तीगत कारणामुळे राजीनामा दिला असे नमूद केले आहे व पक्षात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आहे.
एक महिन्यापूर्वी अजित पवार नागपूर दौ-यावर असताना नागपूरमध्ये पक्षाचा मेळावा घेतला होता व त्यानंतर काहीच दिवसात शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांना पदावरून हटवण्यात आले होते. आता चिंतन शिबीर झाल्यावर जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला.