अकोला : राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून योग्य वेळी घेतला जाणार आहे. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार १२ जुनला अकोला दौऱ्यावर आले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे सुरू आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे किंवा इतर कुठलेही प्रश्न असो, ते चर्चेतून सुटत असतात. बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यास राज्य सरकारची तयारी आहे. सरकार व प्रशासन यासंबंधी नियमितपणे त्यांच्या संपर्कात असल्याचेही पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई

शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल. सरकार खते व बी बियाण्यांचे लिकिंग करणाऱ्या दुकानदार व कंपन्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुकानदारांचे परवाने रद्द केले जातील, तर कंपन्यांवरही योग्य ती कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा अजित पवार यांनी दिला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाईल. त्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींनाही दरमहा मदत देण्यास सरकार तत्पर आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटण्याची संस्कृती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही अजित पवार यांनी भाष्य केले. राज्यातील विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे. आम्हीही विरोधी पक्षात होतो, तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपली कामे घेऊन भेटत होतो, असे ते म्हणाले. अजित पवार यांनी यावेळी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली. सहकार क्षेत्रातल्या निवडणुका या पक्षाचे चिन्ह व नावावर होत नाहीत. याआधीही अशा निवडणुकांमध्ये अनेक वेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन निवडणूक लढले असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला व खामगाव दौऱ्यात प्रशासनासह पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.