अकोला : राज्यावर जलसंकटाचे काळे ढग कायम आहेत. विविध भागात मोसमी पूर्व पाऊस कोसळल्याने यंदा राज्यातील धरणांमधील जलसाठा गत वर्षीच्या तुलनेत २.७९ टक्के अधिक आहे. राज्यातील धरणांमध्ये १९ मे रोजी २८.५३ टक्के जलसाठा असून गेल्यावर्षी याच दिवशी २५.७४ टक्के साठा होता. अमरावती विभागात सर्वाधिक ४०.०८ टक्के, तर पुणे विभागात सर्वात कमी २१.४६ टक्के पाणी धरणांमध्ये उपलब्ध आहे.

राज्यात विविध ठिकाणी मोसमी पूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांमधील जलसाठ्यात किंचित वाढ नोंदवल्या गेली. मात्र, अल्प जलसाठ्यामुळे पुरवठ्यावरील संकट कायम असल्याचे दिसून येते. राज्यात मोठे, मध्यम व लघू असे सर्व धरणांची संख्या दोन हजार ९९७ आहे. त्यामध्ये प्रकल्पीय पाणीसाठा मृत सात हजार ७४५.१६ व उपयुक्त ४० हजार ४९८.४१ असा एकूण ४८ हजार २४३.६ द.ल.घ.मी. क्षमता आहे. राज्यातील धरणांमध्ये १९ मे रोजी उपयुक्त ११ हजार ५५२.५७ द.ल.घ.मी. जलसाठा असून एकूण साठा १८ हजार ४४८.०७ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे.

राज्यात एकूण मोठे प्रकल्प १३८ आहेत. त्याची एकूण क्षमता ३५ हजार ५३२.०५ द.ल.घ.मी. असून सध्या उपयुक्त सात हजार ६८९.३७, तर एकूण १३ हजार ७७०.९८ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत २६.४५ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील २६० मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.०८ टक्के जलसाठा असून गेल्यावर्षी तो ३८.९० टक्के होता. राज्यात सर्वाधिक दोन हजार ५९९ लघू प्रकल्प आहेत. त्याची एकूण क्षमता सहा हजार ५२९.११ द.ल.घ.मी. असून सध्या उपयुक्त एक हजार ८२१.७५, तर एकूण दोन हजार २९९.७४ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ३०.७४ आहे. गेल्यावर्षी लघू प्रकल्पांमध्ये ३०.८५ टक्के जलसाठा होता. राज्यातील पुणे, छत्रपती संभाजी नगर व नाशिक वगळता उर्वरित विभागांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा उपलब्ध आहे.

धरण संख्या सर्वाधिक, जलसाठ्यात देखील वाढ

राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक ९२० धरणांची संख्या आहे. या विभागात सध्या २७.४९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण अधिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागनिहाय जलसाठा (टक्केवारी)

विभाग आजचा मागील वर्षाचा
नागपूर ३२.७१ ४०.७४
अमरावती ४०.०८, ४२.७९
छत्रपती संभाजीनगर २७.४९ , ११.७९
नाशिक ३०.७९ , २९.६२
पुणे २१.४६, १८.९३
कोकण ३७.५५, ३८.७४