अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. अकोला जिल्ह्यातील पातूर वगळता चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. २.२२ लाख मतदार पाच नगराध्यक्षांसह १४२ सदस्य निवडणार आहेत. स्थानिक निवडणुकांमध्ये वर्चस्व राखण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चुरस रंगणार आहे.

नगर पालिका व नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका आणि हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. अकोट नगर पालिकेमध्ये नगराध्यक्षांसह ३५ जागांसाठी निवडणूक होत आहे. ३९ हजार ९६४ महिला, तर ४२ हजार ३६१ असे एकूण ८२ हजार ३२५ मतदार आहेत. नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. नऊ नर्षांपूर्वी भाजपने झेंडा फडकावला होता. आता अकोट न. पा. ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांचा चांगलाच कस लागणार आहे.

मूर्तिजापूर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि २५ सदस्य जागांसाठी २० हजार २१४ महिला, १९ हजार ८३१ पुरुष व इतर चार असे एकूण ४० हजाार ०४९ मतदार आहेत. मूर्तिाजपूर येथे देखील भाजपचे नगराध्यक्ष होते. बाळापूर नगर पालिकेचे अध्यक्ष व २५ सदस्य निवडले जाणार आहेत. ४० हजार ५७२ एकूण मतदार आहेत. गेल्या वेळेस नगराध्यक्ष पदावर काँग्रेसने विजय मिळवला होता. तेल्हारा नगर पालिकेच्या नगराध्यक्षांसह २० जागांसाठी निवडणूक होईल. एकूण मतदारांची संख्या १८ हजार २४७ आहे. तेल्हार नगर पालिकेवरही भाजपची सत्ता होती. हिवरखेड नगर पंचायत नव्याने निर्माण झाली आहे. त्याठिकाणी देखील अध्यक्षांसह २० सदस्य २० हजार १७३ मतदार निवडणार आहेत. बार्शीटाकाळी नगर पंचायतमध्ये सुद्धा प्रथमच निवडणूक होणार असून अध्यक्ष व १७ सदस्य निवडले जातील. २० हजार ९४७ मतदारांची संख्या आहे. या स्थानिक निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत.

नगराध्यक्ष पदावरून महायुती व आघाडीत रस्सीखेच

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदावरून महायुती व महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पक्ष आघाडी करून लढणार की स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.