नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघासाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोक मतदान केंद्रावर रांगा लावत आहेत. मात्र, काही भागांमध्ये मतदारांची नावे याद्यांमधून गहाळ असल्याचा आरोप होत आहे. अनेक मतदारांची नावेच नसल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, यामध्ये साम्यवादी विचारधारेचे आणि समाज माध्यमांवर भाजपविरोधी भूमिका मांडण्यात सक्रिय असणाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या नागपूर येथे विकास ठाकरे यांची थेट लढत दोन वेळा सलग विजयी झालेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. या ठिकाणी काँग्रेसने देखील तगडा उमेदवार देत जोरदार प्रचार केला. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवर उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. नागपूरच्या सर्वच मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. लोकांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लावल्या. त्यानंतर दुपारी मतदारांची गर्दी वाढत आहे.

हेही वाचा…मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, मतदार याद्यांमधून अनेकांची नावे गहाळ असल्याचा आरोप होत आहे. नाव गहाळ होणाऱ्यांमध्ये समाजवादी नेते प्रताप पाटील, विवेक देशपांडे, मुकुंद गडलिंग अशी अनेक नावे आहेत. अनेक लोक नेहमीच्या मतदान केंद्रावर गेले. मात्र, त्यांचे नावच तेथे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली असता नावच गहाळ झाल्याचे समोर आले. अन्य कुठल्या मतदान केंद्रांमध्येही त्यांचे नाव नाही. यामध्ये समाज माध्यमांवर भाजपविरोधी भूमिका मांडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा आरोप मतदारांकडूनच होत आहे.