अमरावती : प्रधानमंत्री ‘सूर्यघर मोफत वीज योजने’च्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील १६ हजार ७०८ ग्राहक वीज क्षेत्रात स्वावलंबी झाले आहेत. या ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर बसवलेल्या सौर पॅनेलमुळे एकूण ६८.८७ मेगावॅट वीज तयार होत आहे. या योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असल्याने ग्राहकांना शून्य वीजबिल मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी केले आहे.

दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेला वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षभरात या योजनेचा लाभ १६ हजाराहून अधिक ग्राहकांनी घेतला आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवून ग्राहक दरमहा १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळवू शकतात.

कर्ज आणि अनुदान सुविधा

सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी विविध बँकांकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध आहे. कर्जाची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी ग्रामपंचायतींनाही प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी दिली जात आहे आणि सौर नेट मीटर देखील उपलब्ध करून दिले जात आहेत.

जादाची वीज विकून उत्पन्नही

ग्राहकांनी निर्माण केलेली वीज त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी वापरता येते आणि गरज भागवून शिल्लक राहिलेली वीज महावितरण विकत घेते. त्याची रक्कम ग्राहकांच्या वीजबिलातून समायोजित केली जाते. केंद्र सरकारकडून घरगुती ग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार, तर तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट दिले जाते.

ग्राहकांना संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती मिळू शकते. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ग्राहक आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडू शकतात आणि प्रकल्प बसवल्यानंतर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

पीएम-सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन व सुलभ करण्यात आल्या आहेत. – अशोक साळुंके, मुख्य अभियंता