वर्धा : देश पातळीवरील सभा, परिषदा, संमेलने यांचे महत्व सांगायला नको.  देश हिताचा विचार किंवा धोरण याचा त्यात उहापोह होत असतो. त्यामुळे संबंधित विषयाशी निगडित असे सर्वच त्यात सहभागी होत असतात. हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे होत आहे. विविध राज्यात त्यादृष्टीने उपक्रम आयोजित केल्या जात आहे. याच अनुषंगाने नॅशनल फेडेरेशन ऑफ अर्बन कॉपरेटिव्ह बँक अँड क्रेडिट सोसायटी ( नॅफकब ) या सहकारी बँकेच्या शिखर संस्थेने एक उपक्रम आयोजित केला आहे.

अश्या सहकारी बँकांची एक आंतरराष्ट्रीय परिषद दिल्लीतील विज्ञान भवन या प्रतिष्ठित सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. १० व ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस ही परिषद चालणार आहे. त्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे प्रामुख्याने संबोधित करणार आहे. नॅफकबच्या विविध उत्सवाचा एक भाग म्हणून ही परिषद आहे.उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. शहरी सहकारी पतसंस्था प्रतिनिधी यात सहभागी होत आहे. सर्व राज्यांचे सहकार मंत्री, सहकार मंत्रालयाचे अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व अन्य वरिष्ठ प्रामुख्याने उपस्थित राहतील. ही एक ऐतिहासिक परिषद ठरणार असल्याचे सांगण्यात येते. परिषदेचे उद्दिष्ट निश्चित झाले आहे. परस्पर सहकार्य, नवोन्मेष व धोरणत्मक प्रगतीद्वारे शहरी सहकारी पत क्षेत्रास बळकटी देण्याचा हेतू आहे. ही परिषद त्यावर प्रकाश टाकणार.

या परिषदेत शहरी सहकारी बँका तसेच पतसंस्था यांचा १०० टक्के सहभाग अपेक्षित धरण्यात आला आहे. आयोजन स्थळ विज्ञान भवन येथे १२०० व्यक्तींची आसन क्षमता आहे. त्यामुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य, असा निकष ठेवण्यात आला आहे. शुल्क भरल्यानंतच सहभाग निश्चित होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी येथील सुप्रसिद्ध वर्धा अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष सुधाकर साटोणे यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. कुपकुंभ २५ हे आयोजन सहकारी पतसंस्थासाठी महत्वपूर्ण असे राहणार. शहरी पतसंस्था पुढे काळानुसार विविध आव्हाने उभी ठाकली आहे. त्यास चांगले वळण मिळणे अपेक्षित आहे. केंद्रीय सहकारमंत्रीपद भूषविणारे अमित शहा हे पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन करतील. ती धोरणात्मक बाब राहील. ही प्रामुख्याने बहुराज्यीय  पतसंस्थांची म्हणजे ज्या केंद्रीय सहकार खात्याशी निगडित आहेत, अश्या पतसंस्थांच्या प्रतिनिधीची परिषद आहे.