अमरावती : वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दूल कलाम अब्दूल कादीर (५४, रा. जमील कॉलनी) यांची शनिवारी सायंकाळी नवसारी चौक ते चांगापूर फाट्यादरम्यान धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
या हत्येला काही दिवसांपुर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल कलाम हे शनिवारी सायंकाळी घरून दुचाकीने वलगाव ठाण्यात कर्तव्यावर जात होते.
दरम्यान अब्दूल कलाम दुचाकीने नवसारी टी पॉइंटपासून पाचशे मीटर समोर गेल्यानंतर मागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे कलाम यांच्या एका पायाला व शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या व ते रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर कोसळले. मात्र अपघातानंतरही ते जिवंत असल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी अब्दूल कलाम यांना मुख्य रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, असा घटनाक्रम तपासात समोर आला आहे. या अपघातात आरोपींची कारसुद्धा मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली असून, अमरावतीहून परतवाड्याच्या दिशेने जाणारी कार धडक दिल्यानंतर १८० अंशांच्या कोनात फिरून अमरावतीच्या दिशेने झाली होती.
अब्दूल कलाम यांच्या बंधूंचा आणि एका व्यक्तीचा पैशांचा व्यवहार होता. या व्यवहारावरून त्यांच्यात गेल्या आठवड्यात काही वाद झाला होता. या वादाची पार्श्वभूमी या घटनेला आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. या प्रकरणी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून दोन आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली, तर एक आरोपी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यालाही रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.
आनंदाचे क्षण आणि दु:खद वार्ता
अब्दूल कलाम यांच्या मुलीने शनिवारीच फिजिओथेरपिस्टची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच आनंदात कलाम यांनी शनिवारी दुपारी वलगाव पोलीस ठाण्यात सहकाऱ्यांना पेढे वाटले होते. ते प्रचंड आनंदी होते. समाज माध्यमांवर त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल अभिनंदनही सुरू होते. अशातच सुरुवातीला त्यांच्या अपघाती निधनाची व त्यानंतर काही वेळातच त्यांची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस अधिकारी, अंमलदारांसह सर्वांनाच धक्का बसला.