अमरावती : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. हनुमान चालिसा वाचणारी हिंदू शेरनी थोड्याच दिवसांची पाहुणी आहे, लवकरच उडवून टाकणार, असा धक्कादायक मजकूर अज्ञात व्यक्तीकडून राणा यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानमधील वेगवेगळ्या क्रमांकांवरून या प्रकारच्या धमकीचे संदेश सातत्याने येत असून राणा यांनी यासंबंधीची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे.
यापूर्वीही धमकी
माजी खासदार नवनीत राणा यांना ऑगस्ट २०२३ मध्ये, अमरावतीतील एका व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्च २०२५ मध्येही नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आले होते. यामध्ये आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख होता. नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली होती.
बकरी की अम्मा कब तक खैर मनायेगी – राणा
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नवनीत राणा यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते. नवनीत राणा म्हणाल्या की, ‘घर मे घुसकर मारा है, कबर तुम्हारी खोदी है. देश की गद्दी दिल्ली पर बाप तुम्हारा मोदी बैठा है…क्या बोलते छोटे पाकिस्तान, बकरी की अम्मा कब तक खैर मनायेगी. चुन चुन कर मारेंगे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी धन्यवाद आणि अभिनंदन करते. घर मे घुसके मारेंगे, हे काय असते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे’.
दोन दिवसांपुर्वी पाकिस्तानातून धमकी
दोनच दिवसांपूर्वी नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीतील डव हेरिटेज गारमेंट कंपनीत काम करणाऱ्या ओडिशातील एका युवकाला पाकिस्तानहून (+९२ कोड) धमकीचा व्हॉट्सअॅप कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने स्वत:ला पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगून, दिल्लीतील चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली होती. या कॉलमुळे घाबरलेल्या युवकाने तत्काळ नांदगावपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.