अमरावती : राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला असताना, दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही शासनाकडून कोणतीही कर्जमाफी, मदत किंवा दिलासा न मिळाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचलपूर येथील तहसील कार्यालयासमोर ‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी’ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी प्रतीकात्मकरीत्या ‘झुणका-भाकर’ खाऊन शेतकऱ्यांच्या जगण्यातील कटू वास्तवावर प्रकाश टाकला आणि शासनाच्या निष्क्रिय धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
पिकांचे नुकसान, वाढती कर्जबाजारी परिस्थिती आणि शेतमालाच्या दरातील घसरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशा बिकट परिस्थितीतही राज्य सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांवर दिवाळीतही निराशेचे सावट पसरले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. शासनाच्या याच उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान, उपस्थित वक्त्यांनी शासनाच्या धोरणांवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या अंगणात सणाऐवजी अंधार पसरलेला आहे. दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना उपजीविकेची चिंता भेडसावत आहे, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. सोयाबीनला हमीभावापेक्षा फारच कमी भाव मिळत आहे. यावेळी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादकताही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जाण्यावाचून पर्याय उरलेला नाही, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हा, तालुका आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी जिल्हा सदस्य वासंती मांगरोळे, महिला तालुका अध्यक्षा अश्विनी पेटकर, तालुका अध्यक्ष नामदेव तनपुरे, शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे, उपसभापती अमोल चिमोटे, देवेंद्र पेटकर, श्रीधर काळे, राहुल गाठे, सचिदानंद बेलसरे यांच्यासह दिनेश वानखडे, अमोल बोरेकर, सईद मौलाना, कैलास आवारे, राजेश काळे, रवींद्र हरणे, नितेश दाभाडे, गजानन टापरे, प्रशांत गोरले, श्रीकांत अपाले, हबीब खा पठाण, ममराज कडू, नितीन खालोकार, गणेश बेलसरे, राजीव कळमकर, अशोक दाणे, प्रमोद कांबळे, विनायक चौधरी, विजय बेलसरे, नितीन बोन्डे, जय घोरे, आगाभाई, देवेंद्र ठाकरे, संजय शेटे, बाबा बुंदेले, नईमभाई, रवी शुक्ला, अज्ञेश पेटकर, अजीज पटेल, महेरुल्लाभाई, अहमदभाई, कदीर पेहलवान आदींचा सहभाग होता.
काँग्रेसने या आंदोलनातून शासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, पुढील काळात राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.