अमरावती : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांना महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, अशा शब्‍दात इशारा दिला असताना त्‍यानंतर अवघ्‍या काही तासांत नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्‍या प्रचार सभेला उपस्थित राहून महायुतीच्‍या नेत्‍यांना आव्‍हान दिले. नवनीत राणा यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्‍यावर शेलक्‍या भाषेत टीका केली. त्‍यांचा उल्‍लेख ‘दीडफुट्या’ आणि ‘चारफुट्या’ असा करीत या लोकांनी दर्यापूर मतदारसंघाला दहा वर्षे मागे नेले आहे. मुंबईवरून आलेले हे पार्सल परत पाठवले पाहिजे, अशी टीका केली.

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, रमेश बुंदिले यांच्‍या प्रचाराला नवनीत राणा येणार नाहीत, असे अनेक लोक म्‍हणत होते, पण मी कुठल्‍याही वादळांना घाबरत नाही. भाजपचा दुपट्टा घेऊन मी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी उभी आहे. दर्यापूर मतदारसंघ मी दत्‍तक घेतला आहे. मी पराभूत झाली असली, तरी अधिक मजबूत बनली आहे. मुंबईच्‍या सिटी को-ऑपरेटिव्‍ह बँकेत ९०० कोटी रुपयांचा घोटाळा कुणी केला, कामगारांचे पैसे कुणी खाल्‍ले हे अडसूळ यांना विचारायला हवे. बाहेरून आलेल्‍या या लोकांना लोकसभा निवडणुकीत आमच्‍या पाठीत खंजीर खुपसला. आता हे बाहेरचे पार्सल चालणार नाही. अमरावती जिल्‍हा एवढा सोपा नाही. २०१९ मध्‍ये कॅप्‍टन अडसुळांची अनामत रक्‍कम जप्‍त झाली होती. त्‍यापेक्षाही कमी मते यावेळी मिळतील, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

हेही वाचा : Rohit Pawar: “नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची दहशत”, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

u

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, या निवडणुकीत बाहेरचे पार्सल चौथ्‍या क्रमांकावर जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात सर्व आमदार एकवटले होते. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एका महिलेला पराभूत करण्‍याचे काम केले. पण, त्‍यामुळे मी विचलित झालेली नाही.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?

नवनीत राणा यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवार गजानन लवटे यांच्‍यावरही टीका केली. मी ज्‍यावेळी मतदारसंघात फिरत होती, तेव्‍हा महिलांनी माझ्याकडे एकच मागणी केली की, गावातील दारू बंद झाली पाहिजे. पण हे उमेदवारच दारू विक्रेते आहेत. गावात पाण्‍याऐवजी दारूची पाईपलाईन टाकली जाईल. अशा लोकांना तुम्‍ही निवडून देणार आहात का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

Story img Loader