अमरावती : पावसाचा फटका रेल्वे गाड्यांना बसत आहे. त्यामुळे अनेक रेल्वे नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. हावडा मेल, विदर्भ, गीतांजली, बडनेरा मेमू, मडगाव-नागपूर, पुरी एक्स्प्रेससह नऊ गाड्या विलंबाने धावत आहेत.
पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर होतो आहे. बडनेरा जंक्शनवर येत असलेल्या रेल्वे गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने येत आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना गाड्यांची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. मुंबई ते नागपूर मार्गावर गितांजली एक्स्प्रेस २० मिनिटे, बडनेरा मेमू चार तास ४५ मिनिटे, मडगाव-नागपूर एक्स्प्रेस ४ तास ४९ मिनिटे, विदर्भ एक्स्प्रेस २६ मिनिटे उशिराने धावत आहे.
कालही अनेक गाड्यांना उशीर झाला. नागपूर-अमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस दोन तास उशिरा आली. नागपूर मार्गावरील काटेपूर्णा स्टेशनजवळ मालगाडीचा खोळंबा झाल्याने नागपूरकडून येणाऱ्या गाड्यांना फटका बसला. तसेच मुंबईकडून भुसावळकडे येणारी गीतांजली एक तास विलंबाने धावत होती. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसलाही दीड तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांची पंचाईत झाली. प्रवाशांचे नियोजन कोलमडले.
नाशिक रोड-बडनेरा मेमू नाशिकवरून रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी सुटते. पण, बडनेराहून निघालेली मेमू ही काल रात्री ११ वाजून २० मिनिटांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहचली, त्यामुळे नाशिकहून सुटणाऱ्या मेमूलाही उशीर झाला. ही गाडी स्थानकावरूनच रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटली. त्यामुळे ही गाडी तब्बल ४ तास ४५ मिनिटे उशिराने बडनेरा येथे पोहोचणार आहे.
रेल्वे प्रवासी हे अनेक दिवसांपुर्वीच आपले प्रवासाचे नियोजन करतात. ऐनवेळी गाडीच रद्द होत असेल किंवा उशिरा येत असेल, तर प्रवासाचे नियोजन कोलमडते. विदर्भातील अनेक विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी, व्यापाऱ्यांना आपल्या कामासाठी पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जावे लागते. व्यापारीही खरेदी आणि देवाण-घेवाणीच्या निमित्ताने जातात. गाडी उशिराने धावत असल्याने त्यांना एकाच दिवसात पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी जाऊन आणि तेथून काम आटोपून परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना मुक्काम करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. शासकीय कामानिमित्त प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. कार्यालयीन वेळ लक्षात ठेवून हे प्रवाशी रेल्वेने अपडाऊन करण्यासाठी घरून आणि कार्यालयातून बाहेर पडतात. मात्र, या प्रकारामुळे त्यांचेही नियोजन बिघडते. कार्यालयात पोहोचण्यास त्यांना उशीर होतो.