नरखेड तालुक्यातील एका गावात एका मजूराने चोरून दारू पिल्याचा मालकाला संशय झाला. त्यानेसंतापाच्या भरात मजुराला कपडे काढायला सांगून पार्श्व भागावर पेट्रोल टाकून पेटवला. जखमीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू आहे.जीवन भाऊसाहेब पवार (२८) रा. उमठा, ता. नरखेड, जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तर राजेश अशोकराव ठाकरे (४०) रा. रामठी, ता. नरखेड, नागपूर असे जखमीचे नाव आहे. राजेश हा जीवन यांच्या शेतात मजुरीचे काम करत होता.
हेही वाचा : नागपूर : प्रेमी युगुलाने समाज स्वीकारणार नाही या भीतीपोटी केली आत्महत्या
२३ ऑगस्टला राजेश हा जीवनकडे मजुरीचे पैसे मागायला गेला. दरम्यान राजेशने दारू चोरून पिल्याची शंका जीवनला आली. त्यावर रागाच्या भरात जीवनने मजुराला (राजेश) माझी दारू चोरून का ढोसली,अशी विचारना करत चपलेने मारहाण केली. त्यानंतर राजेशची पॅन्ट खाली करून पार्श्वभागावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. राजेशने कशीतरी आग विझवली. त्यानंतर तो प्रथम जवळच्या रुग्णालयात व त्यानंतर मेडिकलला उपचारासाठी गेला. त्याच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी जीवन पवारवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर राजेश १० ते १५ टक्के जळाल्याने त्यावर मेडिकलचे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.