नागपूर: उपराजधानीतील करण कोठारी ज्वेलर्स प्रा. लि. मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मालकाचा विश्वासघात करत दुकानातून ग्राहकांना दाखवण्यासाठी नेलेले ५७ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व नाणे घेऊन पळ काढला.

कौशल रजनीकांत मुनी (४१) रा. बेलतरोडी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी कौशलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शंकरनगरमध्ये करण कोठारी ज्वेलर्स आहे. येथे ग्राहकांसाठी घरपोच सेवाही दिली जाते. त्यानुसार ग्राहकांना रिफाईंड गोल्ड बिस्कीट किंवा नाणे दाखवण्याकरिता दुकानातील कर्मचारी घरी जातात. कर्मचाऱ्यांच्या नावाने अगोदर चालान बनवण्यात येते व कर्मचारी ते सोने ग्राहकांना घरी जाऊन दाखवतात. जर ते सोने ग्राहकांना पसंत पडले तर कर्मचारी परत येऊन बिल बनवतात.

हेही वाचा… ग्रेट व्हाईट नागपुरात विद्युत साहित्य निर्मिती प्रकल्प उभारणार; ३०० कोटींची गुंतवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहकांना जर दागिने पसंत पडले नाही तर परत सोने व चालान जमा करण्यात येते. या प्रक्रियेला १५ दिवस लागतात व त्यानंतर तपासणी होते. आरोपी कौशल रजनीकांत मुनी (४१) याने १८ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान सहा चालान बनवले व ५७.६० लाखांची सोन्याची बिस्किटे व नाणे ग्राहकांना दाखवण्यासाठी घेऊन गेला. मात्र, त्यानंतर त्याने ते सोने दुकानात परत केले नाही व तो कामावरदेखील आला नाही. ही बाब समोर येताच त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो सापडला नाही. अखेर उपविक्री व्यवस्थापक कोशल व्यास यांनी त्याच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील इतरही सराफा व्यवसायिकांमध्ये दहशत पसरली आहे.