वर्धा : शासकीय सेवेत संधी म्हणजे जीवनाचे सार्थक अशी भावना. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची संख्या लाखोत असल्याचे चित्र दिसून येते. तीच बाब अनुकंपा तत्ववरील नोकरीची. पण तब्बल १० वर्ष लोटूनही ही नौकरी पदरात पडत नव्हती. प्रक्रिया किचकट म्हटल्या जात असे. त्यात बदल झाला आणि आज एकाच दिवशी १० हजारावर बेरोजगार शासकीय सेवेत दाखल झाले आहेत.
शासकीय सेवेतील एखाद्या कर्मचाऱ्याचे अचानक निधन झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे धोरण बदलण्याचा निर्णय घेतला. आज हजारो कुटुंबांना न्याय मिळाला. अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्याची प्रक्रिया सोपी झाली, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अनुकंपा तत्वावरील उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथे तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. मुंबई येथून या कार्यक्रमाचे दुरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारण करण्यात आले होते. संपूर्ण राज्यभर आज १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यात ५ हजार १८७ अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात अनुकंपा तत्वावरील गट ‘क’ ३०, गट ‘ड’ २५ तर लोकसेवा आयोगाद्वारे निवडलेल्या ३९अशा ९४ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया आधी खुप किचकट होती. नियुक्त्या देतांना विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या. कुटुंबातील कर्ती व्यक्ती अचानक गेल्याने त्या कुटुंबाचे दु:ख काही प्रमाणात का होईना कमी करता आले पाहिजे, यासाठी धोरणात बदल करण्यात आले. त्यामुळेच राज्यात आज एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुक्त्या देता आल्या, असे पुढे बालतांना पालकमंत्री म्हणाले.वर्धा छोटा जिल्हा आहे. येथील प्रत्येक युवक नोकरीसाठी धडपडत असतो. नोकरीची संधी मिळाली पाहिजे अशी त्याची भावना असते. राज्य शासनाने नोकर भरतीचे चांगले धोरण आणल्याने हजारो युवकांना परिश्रमाच्या बळावर हक्काची शासकीय नोकरी उपलब्ध होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अनुकंपा नियुक्तीसाठी राज्य शासनाचे अतिशय चांगले धोरण आणले आहे. त्यामुळे तातडीने नियुक्त्या मिळून कुटुंबावरील संकट कमी होण्याचे प्रयत्न होत आहे. शासकीय नोकरीमुळे कुटुंबाला आधार मिळतो, असे सांगितले. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी शासकीय नोकरी कुटुंबाचे जीवनमान सुरक्षित करणारी असते. उमेदवारांनी नोकरीत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे कल्याण, समाधान कसे होईल यादृष्टीने काम करावे, असे सांगितले.
जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती देण्याची प्रक्रिया प्रशासनाने कालमर्यादेत राबविली. यावर आधारीत आणि उमेदवारांचे मनोगत असलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसीलदार अतुल रासपयले यांनी केले. किचकट प्रक्रियेमुळे नियुक्तीस पात्र असतांना देखील अनेक उमेदवारांना नियुक्ती मिळत नव्हती. उमेदवारांना वर्ष दोन वर्षाच्या आतच शासकीय सेवेतील नियुक्तीचे आदेश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या धोरणामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला, असे मनोगत अनेक उमेदवारांनी व्यक्त केले.