नागपूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली. ‘जंगल’ प्रत्यक्ष जगलेला माणूस. नोकरीच्या निमित्ताने चितमपल्ली विदर्भात आले आणि विदर्भाचेच झाले.
विदर्भातील जंगलाइतकी श्रीमंती इतरत्र कुठेच मला दिसली नाही, ही वनश्रीमंती जगासमोर यायला हवी, असे सांगत त्यांनी विदर्भातली शेकडो जंगले अक्षरश: पालथी घातली. त्यातून जे संचित हाती लागले त्याला पुस्तकांच्या आणि कोषाच्या रूपाने शब्दबद्ध केले. त्यांच्या पश्चात हा अनमोल ठेवा उरला आहे.
नोकरीच्या निमित्ताने विदर्भातील जंगलाशी त्यांची नाळ इतकी घट्ट जुळली की पत्नीच्या अकाली निधनानंतर टोकाचा एकाकीपणा वाट्याला आला असतानाही त्यांनी नागपूर सोडले नाही. मात्र, आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना या शहरात आधार देणारे कुणी नसल्याने या व्रतस्थ अरण्यऋषीला वेदनादायी स्थलांतर करावे लागले. पाच वर्षांपूर्वी अतिशय जड अंत:करणाने त्यांनी नागपूर सोडून सोलापूरची वाट धरली.
विदर्भाच्या जंगलांचे अंतरंग ज्यांनी खऱ्या अर्थाने जगासमोर उलगडले त्यांना त्यांच्याच आवडत्या शहरात आधार सापडू नये, ही मोठी शोकांतिका ठरली. आधी पत्नी गेली, नंतर मुलीलाही नियतीने हिरावून घेतले. पराकोटीचा एकाकीपणा आला. पण, शरीर खंबीर असेपर्यंत चितमपल्ली डगमगले नाहीत. पाच तपांची अरण्यसाधना त्यांनी तितक्याच नेटाने केली.
या साधनेसाठी एकांत हवा असायचा. मुलीच्या मृत्यूनंतर नागपुरात एकटे राहणे कठीण जात होते. रात्री-बेरात्री कधीही शरीराचे दुखणे डोके वर काढायचे. एकाकीपणातून आलेली ही असुरक्षितता आपल्या प्राणीकोश, वृक्षकोशाचे काम विस्कटून टाकेल, ही भीती त्यांना अस्वस्थ करीत राहायची. म्हणून त्यांनी आपल्या स्वभावाविरुद्ध जाऊन वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयाला विनंती केली. विश्वविद्यालय व्यवस्थापनानेही लगेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. तीन महिन्यांसाठी वर्ध्याला गेलेले चितमपल्ली तेथे तीन वर्षे राहिले.
पुढील शेकडो वर्षे वनअभ्यासकांच्या कामी येतील, असे ऐतिहासिक कोश त्यांनी तेथे जन्मास घातले. शरीर पूर्वीसारखे साथ देत नसतानाही चितमपल्ली यांनी मत्स्यकोशाचा संकल्प सोडला. हिंदी विश्वविद्यालयाच्या एका खोलीत ते कायम लिहिण्यात मग्न दिसायचे. एखाद दुसरी वारी नागपूरला व्हायची. पण, नागपूर कायमचे सोडावे असे त्यांना कधीही वाटले नाही. परंतु वयाच्या ८८व्या वळणावर मात्र कणखर हृदयाचा आणि दांडग्या आत्मविश्वासाचा हा माणूस अखेर खचला.
एखाद्या दिवशी अंधाऱ्या खोलीत आपण निपचित पडून राहू आणि कुणाला कळणारही नाही, अशी भीती चितमपल्ली यांच्या मनाला स्पर्शून गेली असेल कदाचित. त्यांनी अखेर नाईलाजाने नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते मनावर दगड ठेवून आपल्या मूळ गावी अर्थात सोलापूरला रवाना झाले.
चितमपल्ली ज्यांना आपले आदर्श मानायचे त्या पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनाही आयुष्याच्या अखेरीस असाच एकटेपणा अनुभवावा लागला. चितमपल्ली सोलापूरात स्थिरावले खरे, पण त्यांचे मन कायम विदर्भातल्या जंगलात गुंतले होते.