धापेवाडय़ात भाविकांची गर्दी

विदर्भाचे पंढरपूर म्हणून नावारूपास आलेल्या धापेवाडय़ातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठय़ा प्रमाणात वारकरी आणि दर्शनार्थी येऊ लागले आहेत.

दरवर्षी आषाढी एकादशीला धापेवाडय़ाला नागपूर जिल्हा व परिसरातील भाविकांची गर्दी होते. अनेक दिंडय़ा विठ्ठलनामाचा जयघोष करीत धापेवाडय़ात दाखल होतात. यंदा ग्रामपंचायत, देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात भाविकांसाठी व्यवस्था केली आहे. दर्शनार्थीची संख्या बघता मंदिर परिसरात कठडे उभारण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर पूल बांधल्याने भाविकांना मंदिरात पोहोचण्यासाठी मोठी सोय झाली आहे. या यात्रेसाठी कळमेश्वर, मोहपा, काटोल, सावनेर, नागपूर येथून विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे.

धरमपेठेतील लक्ष्मीनारायण मंदिरातून सोमवारी सकाळी धापेवाडय़ासाठी पायीवारी निघाली असून उद्या, मंगळवारी सकाळी ते धापेवाडय़ाला पोहोचणार आहे. त्या ठिकाणी भजन आणि दर्शन घेऊन आदासाला जाणार आहे. याशिवाय जिल्ह्य़ातील अनेक भागातील वारकरी पायीवारी करीत सायंकाळपर्यंत धापेवाडय़ात पोहचणार असल्यामुळे त्यांची व्यवस्था कोलबाजी स्वामी मंदिरात आणि मंदिर परिसरात करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोरे यांच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे. धापेवाडय़ाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आषाढ कृष्ण ९ जुलैला यात्रा भरणार असल्यामुळे त्या दिवशी मोठय़ा प्रमाणात वारकरी आणि दिंडय़ा धापेवाडय़ाला येत असतात आणि त्या दिवशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. चंद्रभागानदी कोरडी पडली आहे. पावसामुळे काही भागात डबके साचले असले तरी ते पुरेसे नाही. त्यामुळे भाविक नाराज आहेत.

विकास कामांचा निधी अप्राप्त

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यटन विकास महाम्ांडळाच्या माध्यमातून धापेवाडय़ाच्या विकासासाठी ४७ कोटीचा निधी दिला असून त्यातून विकास कामे केली जात आहे. जिल्हा परिषदेने मंदिराच्या विकासासाठी १० लाख रुपयाची तरतूद केली होती. या निधीतून मंदिराचे सुशोभीकरण करण्यासोबत मंदिर मार्गावरील रस्ते बांधण्यात येणार होते. निधी मिळाला नसल्याचे समोर आले आहे. नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडय़ामध्ये भाजपचे ग्रामपंचायत सदस्य आहे आणि जिल्हा परिषद सदस्य भाजपचे आहेत, मात्र त्यानंतरही निधी उपलब्ध होत असल्यामुळे त्याचा पाठपुरावा केला जात आहे, असे सरपंच मनोहर काळे यांनी सांगितले.

नागपुरातही विविध कार्यक्रम

नागपुरातही अनेक प्राचीन विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे असून आषाढी एकादशीला या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रतापनगर, गोपालनगर, गणेशपेठ येथील जोशींचे विठ्ठल मंदिर, कर्नलबाग येथील नामदेवबुवा ढेंगे यांचे विठ्ठल मंदिर, भोसलेकालीन घुईंचे विठ्ठल मंदिर आणि नबाबपुरा भागातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जुनी मंगळवारी भागातील मारोतराव राऊत यांच्याकडील विठ्ठल-रखुमाई मंदिर म्हणजे प्रतिपंढरपूर आहे. नागपुरात ५० हून अधिक विठ्ठल मंदिरे असून त्या मंदिरातील प्रमुख वारकरी वारीसाठी पंढरपूरला जातात.