डिसेंबरमध्ये नागपुरात होणार होता सत्कार

नागपूर : इतिहासकालीन माहिती आणि महाराष्ट्राची लोककला याची सांगड घालून विदर्भात नागपुरात ‘शिवसृष्टी’ या नावाने ‘थीमपार्क’ची निर्मिती व्हावी, अशी इच्छा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची होती. त्यांच्या नागपूर भेटीत यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही इतिहासप्रेमींशी त्यांनी चर्चा केली होती. मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

बाबासाहेबांचे नागपुरातील स्नेही मकरंद कुळकर्णी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना वरील माहिती दिली. ‘शिवसृष्टी’ मध्ये शिवकालीन साहित्य आणि संस्कृतीची माहिती दिली जावी अशी त्यांची संकल्पना होती. यासंदर्भात गडकरी यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी स्थायी स्वरूपात जागा त्यासाठी देण्याचे ठरले. पण गेल्या दोन तीन वर्षांत त्यावर चर्चा झाली नाही आणि शिवसृष्टीचा प्रकल्प मागे पडला, असे मकरंद कुळकर्णी  यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात ते नागपुरात आठ दिवसांसाठी येणार होते आणि त्यांनी वयाच्या शंभरीत प्रवेश केल्याच्या निमित्ताने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच बाबासाहेबांचे निधन झाले, त्यामुळे सर्वच राहून  गेले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि सहित्य प्रसार केंद्राचे राजाभाऊ कुळकर्णी यांची घनिष्ठ अशी मैत्री होती. त्यांच्या मैत्रीमुळेच बाबासाहेब पूर्वी वर्षांतून किमान दोनवेळा तरी नागपुरात येत असत. येथे अनेक संस्थांना भेट देत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांना भेटत. प्रत्येकाला ते  शिवचरित्र वाचण्याचा आग्रह करीत होते.

बाबासाहेबांची शेवटची नागपूर भेट १५ फेब्रुवारी २०२०ला व्याख्यानाच्या निमित्ताने झाली होती. नागपुरात जिजाऊ यांच्यावर व्याख्यान करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार पर्सिस्टंट सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते. ते त्यांचे नागपुरातील शेवटचे व्याख्यान ठरले.

१९५५ मध्ये नागपुरात पुस्तकाचे एकही चंगले दुकान नव्हते. त्यामुळे नागपुरात सहित्य प्रसार केंद्राची स्थापना वडिलांच्या ( राजाभाऊ कुठकर्णी) मागे लागून करून घेतली. त्याच काळात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी राजाराम वाचनालयाने पुढाकार घेतला आणि ५६-५६ मध्ये नागपुरात वाचनालयात त्यांचे पहिले जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, असे मकरंद कुळकर्णी यांनी सांगितले.