गडचिरोली : राज्यात नापिकी आणि आधारभूत किमतीसंदर्भात सरकारच्या धोरणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही बाब सरकारच्या वारंवार लक्षात आणून दिल्यावरही त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज तत्काळ माफ केले जाते. गडचिरोलीत तर त्यांच्यासाठी नियम व कायदे पायदळी तुडविल्या जात आहे. गरीब शेतकरी व सर्वसामान्यांची चाललेली ही लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान बनवण्यासाठी तर नाही ना, अशी उपरोधीक टीका प्रहार संघटनेचे संस्थापक तसेच शेतकरी नेते बच्चू कडू यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केली.

कडू म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहे, तरीही येथे युरियाचा तुडवडा निर्माण होतो. याचा अर्थ पालकमंत्र्याचे जिल्ह्याकडे लक्ष नाही, हाच होतो. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षापासून आधारभूत मूल्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे. एकंदरीत विचार केल्यास येथील धान उत्पादक शेतकरी दरवर्षी हेक्टरी १६ हजाराचा तोटा सहन करतो. याकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. मात्र, तेच उद्योगपतींना मदत करण्यासाठी हिरहिरीने पुढे येतात. आजघडीला देशातील उद्योगपतींचे १७ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले.

रिलायन्ससारख्या कंपनीवरील ४८ हजार कोटीच्या कर्जाचा यात समावेश आहे. हे उद्योगपती देशातील सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहे आणि नेत्यांचे खिशे भरत आहे. देशात निर्माण झालेल्या समस्यांवर प्रश्न विचारू नये म्हणून सामान्य जनतेला धर्म व जातीच्या भांडणात गुंतवणूक ठेवून सत्ताधारी आपले हित साधत आहे. महाराष्ट्रात चाललेली लूट ही मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कामी येणार आहे, अशी टीका कडू यांनी केली.

भाड्याने जमिनी देण्याचा घाट कुणासाठी?

नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात कायदा बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावरून आदिवासींमध्ये तीव्र असून रोष आहे. सत्ताधाऱ्यांनी हा सर्व खटाटोप उद्योगपतींसाठी चालवला आहे. गडचिरोलीत मोठे उद्योगधंदे उभारण्यात येत आहे. मात्र, यात किती स्थानिकांना रोजगार मिळाला हे देखील तपासणे गरजेचे आहे. खासगी कंपन्यांसाठी नियम, कायद्यांना बगल दिली जाते, पण गरीब शेतकऱ्यांना याच कायद्याचा धाक दाखवला जातो. हे सरकार तर इंग्रजांपेक्षा अधिक जुलमी आहे. राज्याचा दौरा करून त्यांचे प्रश्न समजून घेत भविष्यात आम्ही एक नवी चळवळ उभी करणार असल्याचे कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, कडू हिवाळी अधिवेशनादरम्यान गडचिरोली ते नागपूर पदयात्रा काढणार आहे.