Nagpur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहे. त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वर्धा रोडवरील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय), एम्स आणि इतरही रुग्णालयांत जाणारे रुग्ण वेगवेगळ्या भागात तासंतास अडकून पडले आहे.

भंडारा येथील रहिवासी असलेल्या एका कर्करुग्ण रोज एनसीआयला किमोथेरपीसाठी येतो. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाने किमोथेरपीसाठी आले असता ते रस्त्यात वाहतुक कोंडीमुळे अडकून पडले. त्यांचे जवाई अशोक शहारे म्हणाले, सासऱ्यांना कर्करोग असून मागील एक वर्षांपासून एनसीआयमध्ये उपचार सुरू आहे. आता रोज किमोथेरपीची गरज रुग्णालयात आता कसे पोहचावे, हा प्रश्न पडला आहे. दरम्यान देशपांडे कुटुंबालाही आंदोलनाचा फटका बसला. नागपुरातील भक्ती देशपांडे त्यांच्या वडिलांची शुअररटेक हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाल्यामुळे दाखल आहे.

रुग्णाला बघण्यासाठी मंगळवारी दुपारी भक्ती शुअरटेक हॉस्पिटलला पोहोल्या होत्या. मात्र हॉस्पिटलच्या समोर वर्धा महामार्गावर संध्याकाळी चक्काजाम आंदोलन सुरू झाले, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि देशपांडे कुटुंबातील तीन महिला लहान लेकरांसह रुग्णालयात १४ तास अडकून पडल्या. आज सकाळी कुठलीच सोय नसल्यामुळे आणि वाहतूक पुन्हा सुरू न झाल्यामुळे अखेरीस या महिलांनी पायीच प्रवास सुरू केले असून २ किलोमीटरचा पायी प्रवास करून या सर्व महिला आधी आऊटर रिंग रोडवर पोहोचल्या आणि त्यानंतर पुढे हुडकेश्वरच्या दिशेने पायी निघाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना भक्ती यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, मात्र आंदोलनामुळे सर्वसामान्यांची अडचण का? असा प्रश्न उपस्थित केला.

एम्सच्या रुग्णांनाही फटका

नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) नागपूरसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलांगणातूनही मोठ्या संख्येने रुग्ण उपचाराला येतात. वर्धारोडवरील मिहान परिसरात असलेल्या एम्सला वर्धा रोडवरूनही मोठ्या संख्येने रुग्ण उपचाराला येतात. परंतु या मार्गावर आंदोलनामुळे वाहतूक ठप्प असल्याने रुग्णांना तेथून रुग्णालयात पोहचायचे कसे? हा प्रश्न पडला आहे. तर पोहचायला विलंब होत असल्याने गरज असलेल्या काही अत्यवस्थ रुग्णांना विलंबानेही उपचार मिळत असल्याचे नातेवाईक सांगतात. त्यामुळे आंदोलकांनी किमान रुग्णांना तातडीने रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग मोकळा करण्याची मागणीही नातेवाईकांकडून केली जात आहे.

अनेक किलोमिटर वाहनांच्या रांगा…

नागपुरात चक्काजाम आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी येथे अनेक किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहे. वाहतुक कोंडीत अडकून हजारो नागरिकांचे हाल होत आहे.