अमरावती : शेतकरी, शेतमजूर, वंचितांच्या दु:खासोबत आपले नाते आहे. आम्ही सरकाला पाठिंबा दिला, पण मग, घरी बसू का? सरकारमध्ये असलो म्हणजे मोर्चे काढायचे नाहीत, असे घटनेत लिहिले आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा मागताना मोर्चा काढू नका, असे सांगितले नव्हते’, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी मोर्चाचे समर्थन केले.
येत्या तीन महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला. शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात बुधवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या समारोपप्रसंगी बच्चू कडू म्हणाले, ज्या लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नाही, त्यांचा आवाज आपण बनलो पाहिजे. आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचून प्रश्न मांडणार आहोत. शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी, तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. सरकार इंच इंच पाऊस मोजते आणि इंचा-इंचाने नुकसानभरपाईचे पैसे मिळतात. शेतकऱ्यांना आाणखी किती अपमानित करणार, याचा विचार झाला पाहिजे.
हेही वाचा… सत्ताधारी आमदाराचा सरकारविरोधात एल्गार; आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक
बच्चू कडू म्हणाले, ‘पेरणी ते कापणीपर्यंत शेताची कामे ही मनरेगामार्फत झाली पाहिजेत. मजुरीचा खर्च सरकारने उचलल्यास शेतकऱ्यांवर ताण येणार नाही. शेतमालाला योग्य भाव देण्याची कोणत्याही सरकारची औकात नाही. स्वामिनाथन आयोग अजूनही लागू झालेला नाही, अशा परिस्थितीत शेतातील मजुरीची कामे मनरेगामार्फत झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.
हेही वाचा… विदर्भवादी आक्रमक! आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याने तणाव, ‘या’ आहेत मागण्या…
कडू म्हणाले, घरकुलाच्या बांधकामासाठी ग्रामीण भागासाठी कमी आणि शहरी भागासाठी जास्त अनुदान मिळते. मतांची किंमत दोन्ही भागांमध्ये सारखी असताना हा भेदभाव का, असा प्रश्न आहे. ही तफावत दूर झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहेत. विरोधक बोलत नाहीत, म्हणून आपल्याला सरकारमध्ये असूनही रस्त्यावर उतरावे लागले आहे. सत्तेत असणे म्हणजे डोके खाली ठेवून गप्प बसणे नव्हे, तर वंचितांना न्याय मिळवून देणे होय.