अमरावती : बिहारपेक्षा भाजपला आता मुंबईची गरज आहे. भाजप काँग्रेसला बिहार देऊ शकते आणि मुंबई ताब्यात घेऊ शकते, ईव्हीएमचा प्रताप दाखवू शकते. निवडणूक आयोगाचे कामकाज हे भाजपच्या कार्यालयातून चालत आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, काँग्रेस इतर राज्यात मराठी विषय घेऊन जाऊ शकत नाही. भाजपला बिहारपेक्षा मुंबई हवी आहे. त्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जाऊ नये, म्हणून बिहारची सत्ता काँग्रेसला दिली जाऊ शकते. म्हणजे ते ईव्हीएमचा खेळ मुंबईत करण्यास मोकळे होतील. ईव्हीएम काँग्रेसने आणली नसती तर आमच्या मते हे पाप आले नसते. त्यांनी चूक केली. ईव्हीएम मशीन ठेवा पण बॅलेट पेपर प्रमाणे, असे आमचे म्हणणे आहे, असे कडू यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. एकदा तरी त्यांनी कोरा करून दाखवावा. आंब्यात एक किडा आढळला म्हणून अमेरिकेने भारतातील आंबे परत पाठवले. पण, अमेरिकेच्या सफरचंदात १०८ किडे असले, तरी आम्ही सफरचंद आयात करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५६ इंच छातीवाले आहेत. सत्तेत आहेत, पण ते अमेरिकेपुढे झुकतात.

देश जाती पातीत अडकवलेला आहे. तुम्हाला आम्हाला त्यामध्ये अडकवून ठेवले आहे. आपणच भांडत राहिलो, तर सरकारसोबत कोण भांडणार असे कडू म्हणाले. सगळ्या गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी कराव्या लागतात असेही कडू म्हणाले. दिव्यांग बांधवाला अनुदान वाढावे म्हणून आंदोलन केले तर मुख्यमंत्र्यांनी एक हजार रूपये वाढविले. आता दिव्यांगांना अडीच हजार रूपये मिळत आहेत. बाकीचे राजकारणी तुम्हाला जाती-धर्मात अडकवत आहेत पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढून दिव्यांगांना न्याय देत असल्यामुळे दिव्यांगाचे मला आशीर्वाद मिळत आहे. पक्षावर निष्ठा ठेवू नका, तुमचे कधीच नसते, सत्ता भावा भावाला ओळखत नाहीत, असे बच्चू कडू म्हणाले.

विधानसभेत दिव्यांगांच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाहीत. मी सामान्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी लढाई लढतो. जाती, धर्माची लढाई लढलो असतो तर आता मी मंत्री असलो असतो असेही कडू म्हणाले. दिव्यांगाच्या प्रश्नासाठी ३५० गुन्हे अंगावर घेतले, मुख्यमंत्र्यांनी १ हजार रूपये अनुदान वाढवले, पण सहा हजार रूपये घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.