अमरावती : विधानसभा निवडणूक प्रचाराच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यात जिल्‍ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बडनेराचे युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी अचलपूर मतदारसंघात बच्‍चू कडू यांच्‍या विरोधात प्रचारयंत्रणा जुंपलेली असताना आता बच्‍चू कडू देखील रवी राणांच्‍या विरोधात मैदानात उतरले आहेत. बच्‍चू कडू हे उद्या १७ नोव्‍हेंबरला बडनेरा मतदार संघातील शिवसेनेच्‍या (उद्धव ठाकरे) बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांच्‍या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. दुसरीकडे, बच्‍चू कडू यांच्‍या पत्‍नी नयना कडू यांनी प्रीती बंड यांच्‍या प्रचारासाठी भातकुली येथे सभा घेतली. त्‍यामुळे बच्‍चू कडू आणि रवी राणा यांच्‍यातील संघर्ष पेटण्‍याची शक्‍यता आहे.

भातकुली येथील सभेत बोलताना नयना कडू यांनी रवी राणा यांच्‍यावर टीका केली. त्‍या म्‍हणाल्‍या, की साडी वाटप, किराणा वाटप करून कुणीही लोकप्रतिनिधी होत नसतो. त्‍यांच्‍या पक्षाचे नाव हे स्‍वाभिमान असले, तरी ते मात्र लोकांना स्‍वाभिमान गुंडाळायला लावतात. महिलांनी ठरविले, तर त्‍या काहीही करू शकतात. त्‍यांच्‍याकडून साडी, किराणा घेऊन कुणी आले, तर नाही म्‍हणायचे नाही. कारण आपल्‍याकडून गेलेले ते आपल्‍या परत आलेले आहे. पण, आपला स्‍वाभिमान गहाण ठेवायचा नाही, असे नयना कडू म्‍हणाल्‍या.

हेही वाचा…कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,

शिवसेनेचे दिवंगत नेते संजय बंड यांच्‍यानंतर प्रीती बंड यांनी समर्थपणे समाजकार्य सुरू ठेवले. शिवसेनेतील त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांनीच प्रीती बंड यांना निवडणुकीत लढण्‍याची प्रेरणा दिली आहे. कार्यकर्त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी मतदारांनी प्रीती बंड यांना साथ द्यावी, असे आवाहन नयना कडू यांनी केले.

हेही वाचा…चंद्रपूर: स्नेहमिलन दिवाळीचे, जेवणात मटनचॉप्स…निवडणुकीने सणाची व्याख्याच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रीती बंड या गेल्‍या निवडणुकीत शिवसेनेच्‍या उमेदवार होत्‍या, पण पराभूत झाल्‍या होत्‍या. यावेळी त्‍यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली नाही. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक बच्‍चू कडू यांनी प्रीती बंड यांच्‍यामागे शक्‍ती उभी करण्‍याचा निर्णय घेतला आहे. प्रीती बंड यांना सर्वच पक्षातील लोकांनी पाठिंबा दिला असून यावेळी बडनेरा मतदारसंघात निश्चितच बदल घडून येईल, असा दावा बच्‍चू कडू यांनी केला आहे. बच्‍चू कडू हे १७ नोव्‍हेंबरला बडनेरा मतदारसंघात प्रीती बंड यांच्‍या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. यामुळे वातावरण अधिकच तापण्‍याची शक्‍यता आहे.