अकोला : आगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट तोडले आता थेट कलेक्टरलाच तोडू, असे वादग्रस्त वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले, तर रविकांत तुपकर यांनी नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे आक्षेपार्ह विधान केले. या प्रकारामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अकोल्यातील मराठा मंगल कार्यालयातील शेतकरी संवाद सभा घेण्यात आली. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत, किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, रविकांत तुपकर, अजित नवले आदींचा समावेश होता. या सभेला विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. या संवाद सभेत बच्चू कडू यांच्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या सभेत बोलताना कडू यांनी नुकत्याच जळगाव येथे झालेल्या आंदोलनाचा दाखला देत, ‘जळगावात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडले, आता यापुढे होणाऱ्या आंदोलनात थेट कलेक्टरलाच तोडू’, असा आक्रमक इशारा दिला.

दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाही – रविकांत तुपकर

शेतकरी संवाद सभेमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान नेपाळमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख करत, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावे लागेल. दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाही, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.

याच सभेला उपस्थित असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांनी आपली जमीन विकू नये असे आवाहन केले. सभेदरम्यान, शेतकरी कर्जमाफी, पिकांना योग्य हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली. रविकांत तुपकर यांच्या विधानामुळे आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

अत्यंत खेदजनक बाब

राज्यभर पावसाने शेतकऱ्यांचे व शेतीचे अतोनात नुकसान केलेले असताना, राज्यकर्ते मात्र अजूनही मदत जाहीर करायला तयार नाहीत. साधे पंचनामे सुद्धा होताना दिसत नाहीत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल पावले टाकली पाहिजेत, असे डॉ. अजित नवले म्हणाले.