केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणात नागपूर शहर पोलीस, बेळगाव स्थानिक पोलीस व कारागृह पोलिसांनी गुरुवारी बेळगावच्या कारागृहात आकस्मिक शोध मोहीम राबवली. त्यात धमकीसाठी वापरलेले भ्रमणध्वनी व सीमकार्ड जप्त केले गेले. पोलीस आरोपीला लवकरच नागपुरात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा >>>भंडारा: वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर अतिक्रमणधारकांचा हल्ला; शासकीय वाहन जाळण्याचा प्रयत्न
गडकरींच्या कार्यालयात खंडणीसाठी आलेल्या धमकी प्रकरणाचे तार कर्नाटकशी जुळल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु अद्यापही फोन करणाऱ्या आरोपीचा हेतू स्पष्ट झाला नाही. या प्रकरणात एका महिलेलाही कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोबत धमकी देणाऱ्या जयेश पुजारा नामक आरोपीलाही नागपुरात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक तपासात बेळगावच्या जेलमधून जयेश पुजाराने गडकरी यांच्या कार्यालयात फोन केल्याचे उघड झाल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. जानेवारी महिन्यातील धमकी आणि दोन दिवसांपूर्वी दिलेल्या धमकीसाठी वापरलेले फोन- सीमकार्डही या कारवाईदरम्यान आढळले. डेटा तपासाअंती गुपितही पुढे येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>नागपूरकरांवर नवा करभार नाही; महापालिकेचा ३३३६.८४ कोटींचा अर्थसंकल्प
मंगळुरूतील मुलगीही संशयाच्या भोवऱ्यात
जयेश पुजारा याने खंडणीसाठी जो क्रमांक वापरला तो मंगळुरूतील मुलीच्या नावावर आहे. ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून मंगळुरूतील रुग्णालयात उपचार घेत आहे. तिचा मित्र जयेश पुजाराचा मित्र आहे. मुलीच्या मित्राकडूनच पुजाराने फोन घेतला व तो धमकी देण्यासाठी वापरला गेला. हा क्रमांक देण्यापूर्वी जयेश पुजारा याने मुलीलाही फोन केल्याचे मुलीच्या जबाबात नमूद केले..